Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती तर नाशिकमधील ढगफुटीचा धोका टळला; मराठवाडा-विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती तर नाशिकमधील ढगफुटीचा धोका टळला; मराठवाडा-विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे....

By: Team Navakal
Maharashtra Rain
Social + WhatsApp CTA

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिक जिल्ह्यावर घोंघावणारे ढगफुटीसदृश संकट सुदैवाने टळले असून हे ढग अहिल्यानगर आणि पालघरमार्गे थेट गुजरात मधील सुरतच्या दिशेने सरकले आहेत. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र: नाशिकमध्ये नद्यांना पूर, इगतपुरीत सर्वाधिक पाऊस
नाशिक जिल्ह्यात ढगफुटी टळली असली तरी पावसाचा जोर प्रचंड होता. येथील इगतपुरी भागात सर्वाधिक २०० मिमी पावसाची नोंद झाली असून, वसंत पवार नगरमधील अनेक घरांमध्ये पूर आलेले पाणी शिरले आहे. इतर तालुक्यांमध्ये त्र्यंबकेश्वर १२५ मिमी, सुरगाणा १४९ मिमी, सिन्नर ७४ मिमी, पेठ ६१ मिमी, दिंडोरी ५८ मिमी, देवळा ४० मिमी आणि पिंपळगाव येथे २१ मिमी पाऊस नोंदवला गेला. सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गोदावरी नदीची जलपातळी वाढल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले असून तिथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरील पूल वाहून गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

मुंबई आणि उपनगरे: लोकल सेवा विस्कळीत, कसारा घाटात दरड कोसळली
मुंबई शहरात ५७ मिमी तर उपनगरांमध्ये ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विक्रोळी, टागोरनगर आणि कन्नमवारनगर या सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्वपदावर येत असली, तरी नालासोपारा-वसई दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मुंबई-पुणे वाहतूक सुरू असली, तरी मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला होता. नवी मुंबईत झाड कोसळून एक महिला दुचाकीस्वार जखमी झाली आहे. दरम्यान, ठाण्यातील सोसायट्यांमध्ये झाडे पडल्यास त्याला संबंधित सोसायटीच जबाबदार राहील, असा दावा ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी केला आहे.

कोकण आणि पालघर: डहाणूत ३९९ मिमी पाऊस; सावित्री आणि जगबुडी नद्या धोक्याच्या पातळीवर
पालघर जिल्ह्यात पावसाने रुद्ररूप धारण केले असून डहाणू येथे तब्बल ३९९ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून तानसा नदीला आलेल्या पुरामुळे अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वसई, विरार, सफाळे आणि वाडा भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ डोंगराला तडे गेल्यामुळे ७० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महाडमध्ये सावित्री नदी आणि संगमेश्वर-दापोलीत जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरीतील परशुराम घाटातील गॅबियन पुलाखालची माती वाहून गेली असून शेलारवाडी येथे दरड कोसळली आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पहाटेच दहिवली येथील भूस्खलनग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्र: पुणे मेट्रोला फटका, आंबेनळी घाट महिनाभरासाठी बंद
पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील बार्शीमाळ परिसरात दरड कोसळल्याने पाबे घाट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पुणे-पानशेत मार्गावरील वराडी पूल वाहून गेला आहे. पावसाचा फटका पुणे मेट्रोलाही बसला असून स्वारगेट मेट्रो स्थानकात पाणी गळती झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील २२ धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. देहू येथील इंद्रायणी नदीकाठावर वारकऱ्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात दरडी कोसळल्याने १६ गावांचा संपर्क तुटला असून, पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुढील एक महिन्यासाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पातळी ३५ फुटांवर पोहोचली असून सांगलीतील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे.

पावसाचा प्रादेशिक असमतोल; मराठवाडा अन् विदर्भ अजूनही कोरडाच
एका बाजूला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसाच्या तीव्र असमतोलामुळे बळीराजा चिंतेत सापडला असून अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत.

हिंगोली: जिल्हा अद्याप पूर्णपणे कोरडा असून पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली आहे.

धाराशिव: जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत जिल्ह्यात अवघा १७ मिमी पाऊस झाला आहे.

बीड: जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ २४ टक्के इतक्याच अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या