Maharashtra Rain Update: मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर आता मान्सूनचा जोर ओसरू लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होणार असून केवळ विदर्भाच्या भागात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठी दिलासादायक बातमी नाशिक जिल्ह्यासाठी आहे. नाशिकला आज अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता आणि तिथे पाऊस सुरूही आहे. मात्र, हवेतील वाऱ्याची दिशा अचानक बदलल्यामुळे नाशिकवर घोंघावणारे ढगफुटीचे मोठे संकट आता अकोले आणि पुढे सुरतच्या दिशेने सरकले आहे. असे असले तरी पुण्याच्या घाट माथ्यावर मात्र अजूनही मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
विदर्भात ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट; पाहा प्रादेशिक हवामान
राज्यातील इतर भागांत पाऊस कमी होत असताना विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र मान्सूनचा प्रभाव पाहायला मिळणार आहे:
- अकोला, अमरावती, बुलढाणा: या तीन जिल्ह्यांमध्ये आजसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र, उद्यापासून येथे पाऊस कमी होईल आणि ‘यलो अलर्ट’ लागू राहील.
- नागपूर, वर्धा, वाशीम: या भागांत आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. वर्धा जिल्ह्यात 9 जुलै रोजी देखील यलो अलर्ट कायम असेल.
- यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यासाठी 9 जुलै रोजी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
- पुणे आणि सातारा: पुण्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ कायम आहे. साताऱ्याच्या घाट भागात पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ असून 9 जुलै रोजी तिथे ‘यलो अलर्ट’ असेल.
- कोल्हापूर: कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात आज आणि उद्यासाठी केवळ ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- नाशिक आणि नंदुरबार: नाशिक जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ आहे, तर नाशिकच्या घाट भागात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ असून उद्यापासून तिथे पाऊस कमी होईल.
- धुळे, जळगाव, अहिल्यानगर: या तीनही जिल्ह्यांत आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. जळगावमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल, तर धुळे आणि अहिल्यानगरमध्ये उद्यापासून पाऊस पूर्णपणे ओसरण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मुंबई-ठाण्याला मोठा दिलासा; पूर ओसरणार
गेल्या 5 दिवसांपासून कोकण आणि मुंबई उपनगरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र, आता इथली परिस्थिती सुधारणार आहे:
रायगड आणि रत्नागिरी: रायगडमध्ये आज ‘ऑरेंज अलर्ट’ असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, उद्यापासून तिथे ‘यलो अलर्ट’ असेल. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवसांसाठी तर सिंधुदुर्गला फक्त आजच्या दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
ठाणे आणि पालघर: ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये सलग ५ दिवस पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पातळी वाढली होती आणि अनेक घरांत पाणी शिरले होते. ठाण्याला आज ‘ऑरेंज’ तर उद्यापासून थेट ‘ग्रीन अलर्ट’ आहे. पालघरला आज ‘रेड अलर्ट’ असला तरी उद्या तिथे ‘यलो’ आणि त्यानंतर ‘ग्रीन अलर्ट’ असेल. म्हणजेच दोन्ही जिल्ह्यांत उद्यापासून पाऊस थांबणार आहे.
मुंबई: मुंबईत आधी ‘ऑरेंज अलर्ट’ होता, तो बदलून आता ‘यलो अलर्ट’ करण्यात आला आहे. शहरात ठराविक ठिकाणी ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात, मात्र उद्यापासून मुंबईतील पाऊस पूर्णपणे ओसरणार आहे.









