MESMA Notice : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट' (BEST) बसच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अचानक संपामुळे आज मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या संपामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असून, मुंबईत आलेल्या पर्यटकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपाची तीव्रता इतकी मोठी आहे की, मुंबईतील एकूण २,७६६ बसेसपैकी अवघ्या ३२ बसेस रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना केंद्र गाठताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बेस्ट प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले असून विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि संप मोडून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसह वेट लीज (भाडेतत्त्वावरील) कंत्राटदारांनाही ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा’ (MESMA – मेस्मा) अंतर्गत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ‘मेस्मा’ हा सरकारला मिळालेला असा विशेष कायदेशीर अधिकार आहे, ज्याचा वापर करून वाहतूक, वीज आणि पाणी यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी संप किंवा आंदोलनांवर निर्बंध घालता येतात. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन, कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक प्रक्रिया केली जाऊ शकते.
उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) मुंबईतील ६३ परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये, यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी प्रशासनाने ६० अतिरिक्त बसेसची विशेष व्यवस्था केली आहे. या बसेस परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी ९ ते दुपारी १ आणि परीक्षा संपल्यानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत धावतील, असे आदेश सर्व डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. याशिवाय, मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) १०० अतिरिक्त बसेस तातडीने मागवण्यात आल्या आहेत.
सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत बेस्ट प्रशासनाने या संपाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बेस्टच्या परिवहन विभागावर संपाचा मोठा परिणाम झाला असला, तरी बेस्टच्या वीज पुरवठा विभागावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही; शहरातील अत्यावश्यक वीज सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










