MNS’s Outrage : मुंबईतील घाटकोपर विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यांवर पांढर्या पट्टे रंगवल्यावरून वाद ताजा असतानाच आज दादरमधील रस्त्यावरही तशाच प्रकारच्या पट्ट्या दिसल्या. या पट्ट्यांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार आक्षेप घेत महापालिका प्रशासनाला दुपारी 3 वाजेपर्यंत हे पट्टे हटविण्याचा इशारा दिला. या इशार्यानंतर पालिकेने धावपळ करून या पट्ट्यांवर काळा रंग फासला.मात्र, पालिकेची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी पट्टे कुणी रंगवले? मनसेने आंदोलन करेपर्यंत पालिकेने स्वतःहून कारवाई का केली नाही? पट्टे रंगवणार्यांविरोधात कारवाई का नाही? असे प्रकार करून मुंबईतील मराठी माणसाला वारंवार डिवचण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होतो आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांचे दादर पश्चिम येथील डी. एस. बाबरेकर मार्गावरील जनसंपर्क कार्यालय आहे. या परिसरातील जैन समाजाच्या आराधना भवनापासून गोकुळ धाम इमारतीपर्यंत संपूर्ण गल्लीत पांढरे पट्टे मारण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच रहिवासी आणि संदीप देशपांडे आक्रमक झाले. यावेळी देशपांडे यांनी ‘सुरेस, परेस नरेस, चड्डीत राहायचे’ असे लिहिलेला टी – शर्ट परिधान केला होता. त्यांनी महापालिका प्रशासनाला दुपारी 3 वाजेपर्यंत हे पट्टे हटविण्याचा इशारा दिला. पट्ट्यावरून वाद तापत असल्याचे लक्षात आल्यावर महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली. पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले. देशपांडे यांच्या इशार्यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर (रंग काढण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव्य) आणि अन्य साहित्य घेऊन इथे दाखल झाले. त्यांनी पट्टे हटवण्याचे काम सुरू केले. पण थिनरने रस्त्यावरचा रंग निघत नसल्याने शेवटी या पट्ट्यांवर काळा रंगलावण्यात आला.
या ठिकाणी जमलेल्या स्थानिक मराठी नागरिकांनी परिसरातील स्वच्छता आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील तक्रारींचा पाढा वाचला. जैन समुदायाकडून सार्वजनिक ठिकाणांचा वापर, पार्किंग व्यवस्थेत अडथळा याबाबत त्यांनी तक्रार केली. या तक्रारींबाबत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. यावेळी स्थानिक महिलांना जैन धर्मगुरूने आवाज कमी करा, असा दम दिला. त्यानंतर महिलाही संतप्त झाल्या. स्थानिकांनी आरोप केला की, जैन समाजातील काही पूजा असेल तर हे संपूर्ण रस्ता बंद करतात. कुठेही वाकड्यातिकड्या गाड्या लावतात. एकदा यांच्यामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. आराधना भवन येथे लहान मुलांची दुपारी दोन तास धार्मिक शिक्षण देणारी शाळा चालवली जाते. या नावावर धर्माचे उद्योग चालतात. यांच्याकडे आधी परवानगी नव्हती. पण नंतर दबाव आणून ती मिळवली. अनेक वेळा तक्रार केली. पण उपयोग होत नाही. सकाळी या जैन महिला रस्त्यावर मूत्र टाकतात. त्यांना आत बेसीनची सोय करून दिली आहे. तरीही त्या रस्त्यावरच मूत्र टाकतात. हे योग्य आहे का? कपडे धुतलेले पाणी, भांडी धुतलेले पाणीही रस्त्यावर टाकतात. चातुर्मासात त्यांचे साधू येतात तेव्हा सकाळपासून ढोल-ताशे वाजतात. आम्ही अनेकदा तक्रार केली, पण कुणी लक्षदेत नाही.
यावेळी येथील एका जैन नागरिकांनी सांगितले की, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. पण ह्या ठिकाणी शेवाळे तयार झाले आहे. त्यावरून पाय घसरू नये. तसेच उन्हामुळे पायाला चटके बसतात, यासाठी आम्ही हे पांढरे पट्टे मारले. यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, सार्वजनिक जागांचा वापर नियमांनुसारच व्हायला हवा. यांचा धर्म यांना सांगतो का की ज्यामुळे लोकांना त्रास होईल ती गोष्ट रस्त्यावर करा. हे यांची पापं झाकण्यासाठी कबुतरांना खायला घालणार. त्याचा त्रास आम्ही सहन करायचा? रस्त्यावरची ही पांढरी पट्टी सिम्बॉलिक आहे. आज इथे केले, उद्या तिथे करणार. हा सांस्कृतिक दहशतवाद करण्याचा प्रयत्न आहे. आमचा नमाजाला विरोध आहे तसा पट्टा मारण्याला विरोध आहे. जो कायद्याच्या विरोधात जाणार, त्याला आमचा विरोध असेल.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत जैन समाज आणि मनसे यांच्यात विविध मुद्यांवरून वाद होत आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाटकोपरमधील गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल गृहनिर्माण संस्थेत मांसाहार करणार्या एका मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित सोसायटीत जाऊन याबाबत जाब विचारला होता. त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये दादर येथील कबुतरखान्यावरून स्थानिक नागरिक, मनसे आणि जैन समाज यांच्यात वाद झाला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि आरोग्यविषयक कारणांमुळे महापालिकेने कबुतरखाना बंद करण्याची कारवाई केली होती. पण धार्मिक भावना आणि कबुतरांना खाद्य देण्याच्या परंपरेचा दाखला देत जैन समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. यावरून आंदोलनही केले होते. सध्या हा कबुतरखाना बंद आहे. काही दिवसांपूर्वी मलबार हिल परिसरातील चौकांमध्ये लावण्यात आलेले गुजराती नामफलक मनसेने आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने हटविले होते. तर गेल्या आठवड्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने विद्याविहार परिसरातील कैलास अॅव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढर्या रंगाचे पट्टे रंगवल्याची पोस्ट टाकली होती. सोसायटीतील सर्व रहिवाशांची संमती न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले होते. अखेरीस या पट्ट्यांवर लाल-पिवळा रंग लावण्यात आला होता. मात्र, या वादात प्रसाद वेदपाठकचे इन्स्टा अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. आता दादरमधील पट्ट्यांमुळे मराठी-जैन यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
मुस्लिमांना थांबवून दाखवा
जैन मुनीचे मनसेला आवाहन
दादर कबुतरखाना बंद केला तेव्हा कबुतरांना खायला घालणारच अशी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा देणारा जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनी याने पुन्हा एकदा दंड थोपटले. तो म्हणाला की, जैन समाज शांतताप्रिय आहे, याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत. जैन समाजाला मी आवाहन करतो की, तुम्ही शांतता राखा. संदीप देशपांडे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात असतील तर बाळासाहेब ठाकरे यांनी जैन, मारवाडी लोकांवर प्रेम केले. त्यांना कुठलाही त्रास दिला नाही. संदीप देशपांडे तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार, पायधुनीला जा. तिथे ज्याप्रकारे ईदच्या दिवशी किंवा नमाज पढताना रस्त्यावर पांढरे घालून बसतात त्याला विरोध करा. मुंब्र्यामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते की मुंब्रा हरा कर दुंगी. त्याला तुम्ही विरोध करा, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका.










