Moshi Rescue Operation : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमधील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेला आता ६४ तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या कालावधीत अहोरात्र मदतकार्य सुरू असून अजूनही ढिगाऱ्याखाली ८ कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये आणि परिसरात एकूण २३ जण अडकले होते, त्यापैकी आतापर्यंत १४ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. उर्वरित कामगारांना शोधण्यासाठी ‘एनडीआरएफ’ (NDRF), लष्कर आणि अग्निशमन दलाचे जवान आपल्या जिवाची बाजी लावून काम करत आहेत.
कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून तीन मजली इमारत उद्ध्वस्त
ही अत्यंत दुर्दैवी घटना बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली. मोशी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा (साचलेल्या जुन्या कचऱ्याचा) एक प्रचंड मोठा ढिगारा अचानक घसरला. हा ढिगारा थेट ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर येऊन कोसळला. कचऱ्याच्या अफाट वजनामुळे इमारतीचा मोठा हिस्सा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला आणि तिथे कार्यरत असलेले कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने स्लॅब पाडण्याचे काम सुरू; अनेक आव्हानांचा सामना
सध्या मोशीमधील घटनास्थळी बचावकार्य अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत सुरू आहे. मुसळधार पाऊस, अपघातामुळे इमारतीचा उरलेला ढाचा अत्यंत अस्थिर आणि कधीही कोसळेल अशा स्थितीत असणे, तसेच कचऱ्यामुळे निर्माण झालेला विषारी वायू यांमुळे जवानांना काम करताना प्रचंड अडथळे येत आहेत. असे असूनही जवानांनी योग्य ती खबरदारी घेत शोधकार्य सुरू ठेवले आहे.
सध्या आधुनिक कटर यंत्रांचा वापर करून इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब यशस्वीरित्या हटवण्यात आला आहे. आता पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे पाडकाम आणि ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच स्लॅबखाली उर्वरित ८ कामगार अडकल्याची दाट शक्यता असल्याने आज रात्रीपर्यंत हे शोधकार्य पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत करण्याचे निर्देश-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोशी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मोशी येथील कचऱ्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी ‘लेगसी वेस्ट’च्या बायोमायनिंग प्रक्रियेला वेग देण्याचे आणि दररोज साचणाऱ्या १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी उपस्थिती; प्रशासकीय निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह-
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला आणि घटनास्थळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केले आहे की, आज रात्रीपर्यंत सर्व ढिगारा उपसून बचावकार्य पूर्ण केले जाईल.दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.











