Moshi Rescue Operation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या अत्यंत भीषण आणि खळबळजनक दुर्घटनेला आता तब्बल ४३ तास उलटून गेले आहेत. येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा अवाढव्य डोंगर कोसळल्याने ही इमारत पूर्णपणे पत्त्यांसारखी कोलमडली. या ढिगाऱ्याखाली अद्यापही ८ निष्पाप कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्देवाची बाब म्हणजे, प्रशासनाकडून सुरू असलेले बचावकार्य (Rescue Operation) अत्यंत संथ गतीने आणि ढिसाळपणे सुरू असल्याने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या संयमाचा बांध सुटला असून त्यांच्या आक्रोशाचा आणि तीव्र संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून नातेवाईक धावले; केवळ ४ पोकलेनच्या भरवशावर बचावकार्य
या भीषण आपत्तीची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूरसह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून अडकलेल्या कामगारांचे कुटुंबीय आणि नातेवाईक डोळ्यांत तेल घालून मोशीत धावून आले आहेत. आपल्या कुटुंबातील माणूस ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर यावा, यासाठी ते आशेने वाट पाहत आहेत. मात्र, महानगरपालिकेच्या संवेदनशून्य कारभारावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांचा असा आरोप आहे की, शहरातील एखादे अनधिकृत बांधकाम पाडताना ५० ते ६० पोकलेन यंत्रे आणणारे प्रशासन, इथे मात्र माणसांचे जीव वाचवण्यासाठी केवळ ४ पोकलेन आणि एका क्रेनच्या भरवशावर रात्रभर संथ गतीने काम करत आहे.
“आतमध्ये अडकलेले लोक ‘आई-आई’ म्हणून ओरडत होते”
बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून राहुल गायकवाड, सनी माने आणि नागेश गायकवाड यांच्यासह इतर कामगार आत अडकले आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ढिगाऱ्याखालून एका कामगाराला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. त्या कामगाराने दिलेल्या माहितीने नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्याने सांगितले की, आतमध्ये अडकलेले इतर लोक गंभीर जखमी असून ते अत्यंत वेदनेने ‘आई… आई…’ अशी हाक मारत ओरडत आहेत. एवढी गंभीर स्थिती समोर येऊनही महापालिकेची बचाव यंत्रणा युद्धपातळीवर हलली नसल्याचे नातेवाईकांनी उद्वेगाने सांगितले.
“जर परवाच प्रशासनाने वेगाने काम केले असते, तर आज आमची माणसं आमच्या शेजारी जिवंत उभी असती. या लोकांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या भावाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी ही यंत्रणा घेणार आहे का?”— राहुल गायकवाड यांचे बंधू
“आयुक्त फुगड्या खेळतायत”; नैसर्गिक आपत्तीचा दावा फेटाळला
महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या घटनेचे खापर निसर्गावर फोडत हिला ‘नैसर्गिक आपत्ती’ संबोधले आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी आयुक्तांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरवत हा निव्वळ ‘मानवनिर्मित मूर्खपणा’ असल्याचे म्हटले आहे. नियमांनुसार हा कचऱ्याचा डोंगर केवळ २० फुटांपर्यंत मर्यादित असणे आवश्यक होते; परंतु कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने तो नियमबाह्य पद्धतीने तब्बल १८० फुटांपर्यंत वाढू दिला गेला. यामुळेच हा डोंगर कोसळून संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली.
स्थानिकांनी थेट आयुक्तांवर तोफ डागताना म्हटले की, “आयुक्त साहेबांना माणसांच्या जिवाशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना केवळ स्वतःचे पद महत्त्वाचे वाटते. एका बाजूला इथे गरिबांची मुले कचऱ्याखाली गुदमरत असताना, काल आयुक्त वारकऱ्यांमध्ये जाऊन फुगड्या खेळत होते. आम्हीही वारकरी संप्रदायातील आहोत, पण संकटाच्या वेळी आयुक्तांचे जास्त कर्तव्य कुठे आहे, हे त्यांना कळायला हवे होते.”
लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप दुणावला
या भीषण दुर्घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी फिरकून नातेवाईकांची साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिकांमधील राग अधिक अनावर झाला आहे. केवळ राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी भेट दिली, परंतु त्यांच्या भेटीनंतरही मदतकार्याला अपेक्षित वेग मिळालेला नाही. “येथे जर एखाद्या बड्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा मुलगा अडकला असता, तर मुंबई ते दिल्लीपर्यंतची संपूर्ण यंत्रणा विमानाने पळत आली असती.









