MPSC Exam Big Update: हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आशेचा किरण दाखवणारी बातमी आहे. आयोगाने परीक्षा घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
यापुढे एमपीएससीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आगामी पूर्व परीक्षा ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांवर न घेता संगणकाधारित म्हणजेच ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ (CBT) पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा प्रक्रियेत होणारा वेळेचा अपव्यय रोखणे आणि पारदर्शकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या नव्या डिजिटल प्रणालीमुळे उमेदवारांना निकालासाठी महिनोनमहिने वाट पाहावी लागणार नाही. पूर्व परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत तिचा निकाल संगणकीय प्रणालीद्वारे जाहीर करणे आयोगाला सहज शक्य होणार आहे. नुकताच लागलेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल आयोगाने 22 दिवसांत लावून याची यशस्वी चाचणीही घेतली आहे. यापुढे ही गती आणखी वाढवली जाईल.
एकाच वर्षात नोकरी हातामध्ये; आयोगाचे नवीन टाईमटेबल
ज्या वर्षात जाहिरात आणि परीक्षा होईल, त्याच वर्षाच्या अखेरपर्यंत संबंधित उमेदवाराला नियुक्ती देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आयोगाने ठेवले आहे. याचे कालबद्ध नियोजन खालीलप्रमाणे असेल:
ज्या पदांसाठी मुलाखती घेणे बंधनकारक असते, अशा श्रेणीतील पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया केवळ 9 ते 11 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल. ज्या पदांसाठी केवळ लेखी परीक्षा उत्तीर्ण असणे पुरेसे असते, म्हणजेच मुलाखतीची गरज नसते, अशा पदांची भरती प्रक्रिया 6 ते 7 महिन्यांत संपवली जाईल. या गतिमान नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्षे होणारे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टळणार आहे.
मुख्य परीक्षांच्या पॅटर्नमध्ये कोणताही फेरबदल नाही
आयोगाने स्पष्ट केले आहे की, हा ऑनलाईन किंवा सीबीटी (CBT) बदल केवळ आणि केवळ पूर्व परीक्षांच्या टप्प्यापुरताच मर्यादित असेल. राज्यसेवा असो वा गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’ च्या मुख्य परीक्षा, त्यांच्या स्वरूपात या वर्षी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणेच पारंपरिक आणि जुन्याच पद्धतीने पार पडतील, त्यामुळे उमेदवारांनी गोंधळात पडू नये.
नॉर्मलायझेशन पद्धत पूर्णपणे पारदर्शक; पेपरफुटीला बसेल आळा
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितले की, ऑनलाईन परीक्षा आणि ‘नॉर्मलायझेशन’ (गुण समानीकरण) ही पद्धत पूर्णपणे वैज्ञानिक आणि न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणाऱ्या पेपरच्या काठिण्य पातळीचा समतोल राखण्यासाठी ही पद्धत जगभर वापरली जाते. आयोगाने आतापर्यंत सुमारे 140 लहान-मोठ्या परीक्षा याच पद्धतीने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
देशातील इतर मोठ्या संस्थांचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, रेल्वे भरती बोर्ड (RRB) सुमारे 1 कोटी उमेदवारांची तर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लाखो उमेदवारांची परीक्षा याच डिजिटल पद्धतीने घेते. महाराष्ट्रातही ‘सीईटी सेल’ने नुकतीच 16.30 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा या तंत्रज्ञानावर घेतली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पेपरफुटी सारख्या गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसेल आणि संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.










