BEST Employees Salary Hike: मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ (BEST) बसच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला ३ दिवसांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढण्यात आला.
या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे बेस्टमधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट 15,000 ते 20,000 रुपयांची घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही समान काम समान वेतन कायद्याच्या कक्षेत आणून मोठा दिलासा देण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष आता संपला आहे.
वेतन करार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी झालेले ४ मोठे निर्णय:
प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी खालील पावले उचलली आहेत:
- १. सात दिवसांत नवीन वेतन करार: बेस्टमधील कायम कामगारांचा २०१६ ते २०२१ या काळातील वेतन करार अद्याप झालेला नाही. यावर बेस्ट प्रशासनासोबत येत्या 7 दिवसांत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून कायम कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची तात्पुरती वाढ मंजूर करण्यात आली आहे.
- २. कंत्राटी कामगारांना ३८,००० रुपये पगार: समान काम समान वेतन या तत्त्वानुसार, कायदेशीर चौकटीत राहून कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल. यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार आता दरमहा 38,000 रुपये होणार आहे. तसेच, त्यांना सध्या 2,000 रुपयांची मासिक हंगामी वाढ लागू झाली आहे.
- ३. कायम सेवेत सामावून घेण्याची संधी: कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सेवा अनुभव आणि वयोमर्यादा तपासून त्यांना बेस्टच्या कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी भरती प्रक्रियेत वयोमर्यादेची अट शिथिल केली जाईल आणि कंत्राटी कामगारांना 10 टक्के अतिरिक्त गुण देऊन प्राधान्य दिले जाईल.
- ४. ताफ्यात येणार ५,००० नवीन बस: बेस्ट प्रशासनाचा विस्तार करण्यासाठी पुढील ३ वर्षांत तब्बल 5,000 नवीन बस गाड्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत.
मनुष्यबळात होणार मोठी वाढ; ५०,००0 वर पोहोचणार कर्मचारी संख्या
बेस्टच्या नियमानुसार, ताफ्यातील एका बसच्या संचालनासाठी किमान 11 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. यामुळे आगामी काळात येणाऱ्या 5,000 नवीन बससाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्के कर्मचारी हे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधूनच घेतले जातील.
या मोठ्या भरती प्रक्रियेमुळे आगामी काळात बेस्टच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 50,000 च्या पार जाण्याचा अंदाज आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांचे भविष्य सुरक्षित झाले असून बेस्टची सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा











