Home / महाराष्ट्र / Mumbai Rain : विकेंडचा सगळा प्लॅन फिस्कटणार! मुंबईला पावसाने वेढले, हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी; निष्कारण घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नका..

Mumbai Rain : विकेंडचा सगळा प्लॅन फिस्कटणार! मुंबईला पावसाने वेढले, हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी; निष्कारण घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नका..

Mumbai Rain : महाराष्ट्रभरात पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असून, राज्याची राजधानी मुंबई आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार...

By: Team Navakal
Mumbai Rain
Social + WhatsApp CTA

Mumbai Rain : महाराष्ट्रभरात पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असून, राज्याची राजधानी मुंबई आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरे जलमय झाली आहेत. हवामान परिस्थितीची गंभीर दखल घेत भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीच्या भागांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, आगामी २४ तासांत अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

२४ तासांतील पावसाची नोंद आणि प्रादेशिक आकडेवारी-
गेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील ‘एच-पश्चिम’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक १४६.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल वांद्रे येथील सुपारी टाकी पालिका शाळा परिसरात १४३.४ मिमी आणि पाली पालिका शाळा परिसरात १४०.६ मिमी पाऊस पडला. दक्षिण आणि मध्य मुंबईतही पावसाचा जोर कायम होता; यात ‘जी-दक्षिण’ प्रभाग कार्यालयात १४०.२ मिमी आणि ‘एफ-उत्तर’ प्रभाग कार्यालयाच्या क्षेत्रात १३२ मिमी पाऊस नोंदवला गेला. पूर्व उपनगरांमध्ये मानखुर्द अग्निशमन केंद्र (१२६.८ मिमी), चेंबूरची कलेक्टर कॉलनी (१२४.२ मिमी), महाराष्ट्र नगर (१२०.८ मिमी) आणि घाटकोपरमधील रमाबाई नगर (१२०.२ मिमी) या भागांना पावसाने झोडपून काढले. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातही काल सकाळी ८:३० ते आज पहाटे ५:३० पर्यंत ५८ मिमी पावसाची नोंद झाली असून, आज पहाटेपासूनच मुसळधार सरी कोसळत आहेत.

राज्यभरातील ‘रेड अलर्ट’ची स्थिती-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ४ ते ७ जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर तीव्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता केवळ मुंबई आणि ठाणेच नव्हे, तर पालघर, रायगड, तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवरही ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. या डोंगराळ आणि किनारी भागांमध्ये भूस्खलन (दरडी कोसळणे) आणि नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासकीय सज्जता आणि सुरक्षा उपाययोजना-
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे महानगरपालिका आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सतर्क झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि नौदलाच्या बचाव पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिशक्तीशाली पंप तैनात करण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. विशेषतः समुद्रकिनारे, सखल भाग आणि धोकादायक इमारती किंवा दरडींच्या आसपास जाणे पूर्णपणे टाळावे.
आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक-
नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून खालील आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत:
१. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): १९१६
२. ठाणे महानगरपालिका: ०२२-२५३६४७७९ / ०२२-२५३०१७४० / +९१ ९३७२३ ३८८२७
३. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: १८००-२२२-१०८ / ८६५७८८७१०१
४. पालघर जिल्हा प्रशासन: ०२५२५-२९७४Nz / +९१ ८२३७९ ७८८७३
५. पनवेल महानगरपालिका: ०२२-२७४५८०४० / ४१ / ४२

पुढील काही तास मुंबई आणि परिघातील क्षेत्रासाठी अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या