Mumbai Rain : मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला अत्यंत सावध राहण्याच्या आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची आणि किनारपट्टीच्या भागात तीव्र वादळ येण्याची दाट शक्यता आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रत्येक सुचनेचे आणि अलर्टचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
ठाणे, पालघर, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर तसेच नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. प्रशासनाने या संवेदनशील भागांसाठी कालपासूनच वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या सर्व परिसरांमध्ये आगामी काळात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळणार असून, सोसाट्याचा वारा आणि वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर दर तीन तासांनी हवामानाचा अंदाज घेऊन स्थानिक रहिवाशांना मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारे सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून, ते संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
बाहेर सुरू असलेला पाऊस आणि वादळाचा वेग पाहता रस्त्यांवर किंवा इतर ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेला अत्यंत निकडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याची आणि लांबचा प्रवास पूर्णपणे टाळण्याची विनंती केली आहे. “शासकीय यंत्रणा चोवीस तास कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अत्यंत आवश्यक असेल तरच सुरक्षिततेची खात्री करून बाहेर पडावे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत पावसाचे तांडव; नालासोपाऱ्यात कंबरेइतके पाणी, समुद्राला भरती
मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. पहाटेपासूनच ठराविक अंतराने पावसाच्या अत्यंत तीव्र सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी पुढील काही तासांकरिता ‘रेड अलर्ट’ (Aleret) जारी केला असून, या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वसई आणि विरार परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे, तर नालासोपारा भागात अनेक सखल भागांत कंबरेइतके पाणी साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आल्यामुळे सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. जर पुढील काही तास पावसाचा हाच जोर कायम राहिला, तर मुंबईकरांच्या अडचणीत अधिक भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी
हवामान विभागाचा अतिवृष्टीचा हाच गंभीर इशारा लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खबरदारीचा निर्णय घेतला. महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, आज शनिवार रोजी मुंबईतील सर्व महापालिका शाळा तसेच खाजगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांच्या दुपारच्या सत्राला अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, दुपारच्या सत्रातील शाळा बंद राहतील. तसेच, जे विद्यार्थी सकाळच्या सत्रासाठी आधीच शाळेत आले होते, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे.










