Home / महाराष्ट्र / Narendra Darade’s defeat : फोडाफोडी, 10 लाखांचा पाऊस, फसवणूक! राजकारणाचा चिखल ! महाजनांनी नाटक केले! दराडेंना भाजपानेच पाडले! मविआ सपाट

Narendra Darade’s defeat : फोडाफोडी, 10 लाखांचा पाऊस, फसवणूक! राजकारणाचा चिखल ! महाजनांनी नाटक केले! दराडेंना भाजपानेच पाडले! मविआ सपाट

Narendra Darade’s defeat : उमेदवारांना पैशांचे आमिष, मतदारांची 10 लाख देऊन फोडाफोडी, फसवणूक आणि विश्वासघात यांचा यथेच्छ वापर झालेल्या विधान...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Narendra Darade’s defeat : उमेदवारांना पैशांचे आमिष, मतदारांची 10 लाख देऊन फोडाफोडी, फसवणूक आणि विश्वासघात यांचा यथेच्छ वापर झालेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. नेत्यांची ही उघड खरेदी-विक्री पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे ह्रदय नक्कीच दुखावले आहे. या निवडणुकीत महायुतीचीच सरशी झाली. तर महाविकास आघाडी  भुईसपाट झाली. राजकारणाच्या या चिखलात नाशिकचा निकाल आणखी धक्कादायक ठरला.  भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव केला. पराभवाने संतापलेल्या दराडे यांनी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि मतदारांनी आपला विश्वासघात केल्याचा खळबळजनक आरोप केला. ही जागा शिंदे गटाला सोडली होती. तरीही भाजपाच्या गीते बंधूंनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला. ही बंडखोरी नव्हती तर भाजपाने रचलेले पूर्वनियोजित नाटक होते. गिरीष महाजन नाशिकला बंडखोरी करणार्‍या गोकुळ आणि गणेश या दोन्ही गीतेंची समजूत काढायला गेले . त्यानंतर गणेश गीते यांनी माघार घेतली. गोकुळ गीते यांनी मात्र माघार घेतली नाही.  भाजपाने त्यांच्यावर कारवाईही केली नाही. हा कट आधीच शिजला होता असे आज स्पष्ट झाले. मी प्रयत्न केले असे नाटक महाजन करीत राहिले. पण शिंदेंच्या उमेदवाराला भाजपानेच सुनियोजित पाडले.
नाशिकमध्ये पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू आमदार किशोर दराडे निकालानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी  तडक मुंबईसाठी रवाना झाले. नाशिकमध्ये विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. महायुतीचे गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत असे तीन मंत्री अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी सात-आठ दिवस नाशकात तळ ठोकून बसले होते.

गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरल्यानंतर निवडणुकीआधी शेवटच्या दिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेत गीते यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे गीते यांची उमेदवारी कायम राहिली होती. विजयी झाल्यानंतर ‘मी प्रचार थांबवतो म्हटले होते, माघार घेतो किंवा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतो म्हटले नव्हते’,अशी सूचक प्रतिक्रिया गोकुळ गीते यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे गीते विजयी होताच एकनाथ शिंदे यांनी वेगळीच चाल खेळली. त्यांनी गीतेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्यासाठी खास विमानही पाठवले. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे गीते यांना सहयोगी सदस्यही बनवले. शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर गोकुळ गिते म्हणाले की, हे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की, माझे भाऊ आणि वहिनी भाजपासाठी काम करतात. मात्र मी भाजपाचा सक्रिय सदस्य नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रह आणि दबावामुळे मी ही निवडणूक लढवली. मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत भविष्यात काम करायचे आहे. त्यामुळे मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य राहणार आहे.


या निकालावर गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले. जळगावला निवडणूक असताना मी एकही दिवस तिथे गेलो नाही. फक्त मतदानाच्या चार पाच दिवसांपूर्वी सर्व मतदारांसोबत एक सभा घेतलेली होती. त्यानंतर मी नाशिकमध्ये होतो. नाशिकमध्ये मी पूर्ण वेळ बूथवर होतो, तरीही मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला नाही. नाशिकमध्ये 620 पैकी पावणे पाचशे मते महायुतीची होती. तरीसुद्धा इतकी कमी मते पडली याचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे. आता मी एकनाथ शिंदेंशी जाऊनबोलणार आहे.


नाशिकचा निकाल वगळता राज्यात इतर सगळ्या मतदारसंघात महायुतीने बाजी मारली. मविआचा अक्षरशः दारुण पराभव झाला.  राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मविआचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. हा निकाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजकारणासाठी मोठा धक्का मानला जातो. तर धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपाचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा 721 मतांनी पराभव करत राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम केला.धाराशिवमध्ये मतमोजणी होण्याआधीच भाजपाच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. येथे भाजपाचे बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांना 845 तर काँग्रेसचे महेश देशमुख यांना124 मते मिळाली.


नागपूर मतदारसंघात भाजपाचे राजीव पोतदार तब्बल 682 मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मते मिळाली. येथे काँग्रेसची स्वतःची 170 मते होती. तर मविआचे एकत्रित संख्याबळ 211 होते. तरीही लोंढे यांना 130 मते मिळाल्याने काँग्रेस आणि मित्रपक्षांची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. निकालानंतर माध्यमांशी बोलताना लोंढे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाने प्रत्येक मताला 10-10 लाख रुपये देऊन 100 मते वळवली, असा आरोप करत आपला पराभव झाला असला तरी नैतिक विजय झाल्याचा दावा लोंढे यांनी केला. ते म्हणाले की, मी निवडणूक हरलो असलो तरी नैतिकदृष्ट्या जिंकलो आहे. भाजपाचा दबाव आणि दादागिरीसमोर हिंमतीने उभा राहिलो. निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मला मिळालेली 130 मते ही विकली न गेलेल्या काँग्रेस आणि मविआतील मित्रपक्षांची आहे, हे यानिकालातून सिध्द झाले.


छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुती विरूद्ध मविआ अशी थेट लढत होती. इथे मविआचे उबाठाचे उमेदवार गणेश लोखंडे यांचा भाजपाच्या सुहास शिरसाठ यांनी पराभव केला. मविआकडे संख्याबळ कमी असल्याने विजय महायुतीचा होईल, अशीच अपेक्षा होती. मात्र उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असा आग्रह होता. निकालानंतर पराभूत उमेदवार लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंचा शब्द पाळून निवडणूक लढवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की,  मविआकडे संख्याबळ कमी होते याची आम्हाला जाणीव होती. परंतु पक्षप्रमुखांना ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती. म्हणून मी लढलो. पराभूत झाल्याबद्दल मला खंत नाही. पण आमच्यामुळे भाजपाला विजयासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला भाजपाच्या बड्या नेत्यांना वाटत होते की ही निवडणूक सहज जिंकू.म्हणून ते सुरुवातीला मतदारांना भेटतही नव्हते. परंतु आम्ही प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क करत आहोत हे पाहून भाजपा नेते जागे झाले. त्यांना प्रत्येक मतदाराच्या घरी जाणे भाग पडले. मतांसाठी घोडेबाजारही करावा लागला. एवढे केल्यावर त्यांचा उमेदवार विजयी झाला खरा. परंतु मला मविआच्या एकूण संख्याबळापेक्षा 15 मते जास्त मिळाली. मविआकडे 119 मते होती आणि मला 134 मते मिळाली. याचा अर्थ भाजपाची 15 मते मला मिळाली. हे मतदार भाजपावर नाराज आहेत, हे यावरूनस्पष्ट झाले.


अमरावतीत भाजपाच्या प्रवीण पोटे यांनी सलग तिसर्‍यांदा विजय मिळवत हॅटट्रिक साधली. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत पोटे यांनी वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्या 359 मतांनी पराभव केला. अमरावतीत काँग्रेसने नगरसेवकांसाठी तटस्थ राहाण्याचा व्हिप काढला असूनही काही मतदारांनी तो धुडकावून मतदानात सहभाग घेतला होता. नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले.सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, परभणी-हिंगोली मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सईद खान (शिंदे  गट) 242 मतांसह विजयी झाले. मात्र येथे महायुतीकडे तीन पक्षांची मिळून 300 हून अधिक मते असूनही सईद खान यांना फक्त 242 मते मिळाल्याने महायुतीची 56 मते फुटल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः सईद खान यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी होती. ती मतदानातून बाहेर पडली, अशी चर्चा आहे. संख्याबळाच्या दृष्टीने येथे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 131 जागांसह महायुतीतील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी आमदार राजेश विटेकर व अन्य स्थानिक नेत्यांनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र 2018 मध्ये ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याने एकनाथ शिंदे यांनी या जागेसाठी आग्रह धरला. जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाची जागा भाजपाला दिल्यामुळे शिंदे यांच्या परभणीवरील दाव्याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे अल्पसंख्याक चेहर्‍याला उमेदवारी देण्याच्या भूमिकेतून शिंदेंनी सईद खान यांना उमेदवारी दिली होती. गेली काही वर्षे परभणी जिल्ह्यात सईद खान यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यात मोठेयोगदान दिले.


पाथरी नगरपरिषदेत शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत त्यांनी सत्ता मिळवून दिली होती. याचे बक्षीस म्हणून सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी 577 मताधिक्य मिळवून दणदणीत विजय संपादन केला. मविआचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांना फक्त 17 मते मिळाली.

अनावश्यक गर्दी कशाला?
आशिष देशमुखांची भूमिका

सत्ताधारी महायुतीकडे तीन चतुर्थांशपेक्षाही जास्त संख्याबळ आहे. त्यामुळे आणखी आमदारांची आम्हाला गरज नाही, अनावश्यक गर्दी कशाला हवी, अशी भूमिका भाजपा नेते, नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी आज विधान परिषद निकालांच्या पार्श्वभूमीवर मांडली. सर्व आमदारांना पुरेसा विकास निधी देण्यासाठी आहेत तेवढे आमदार पुरे झाले. आणखी आमदार घेतल्यास पुढे प्रत्येकाला उमेदवारी कशी देणार, असा प्रश्नही निर्माण होईल, असेही देशमुख म्हणाले.

17 पैकी 16 जागा महायुतीने जिंकल्या
या निवडणुकीत महायुतीने ठाणे (रवींद्र फाटक – शिवसेना), यवतमाळ (दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना),  रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग (अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस),  पुणे  (विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर (अरुण लखाणी – भाजपा), अहिल्यानगर (प्राजक्त तनपुरे – भाजपा) या सहा जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.आजच्या निकालानंतर  एकूण 17 पैकी 16 जागी महायुतीचा विजय झाला आहे. त्यात सर्वाधिक 11 जागा भाजपाला मिळाल्या आहेत.  तर शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या