Home / महाराष्ट्र / Shiv Sena : सहाही खासदार उपस्थित शिंदे सेनेत जाहीर प्रवेश

Shiv Sena : सहाही खासदार उपस्थित शिंदे सेनेत जाहीर प्रवेश

Shiv Sena : उबाठातून बंडखोरी करणार्‍या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Shiv Sena : उबाठातून बंडखोरी करणार्‍या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी आज अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्ण झाले आहे. खासदारांच्या प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, पहिल्या उठावाच्या वेळी 40 आमदार होते. आता दुसर्‍या उठावाच्या वेळी षटकार मारला आहे. शिवसेनेत सहभागी झालेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही.


सहापैकी संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील हे चार बंडखोर खासदार बंडखोरीनंतर प्रथमच मुंबईत आले. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते कडेकोट सुरक्षेत प्रथम  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी गेले. संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर आधीच तिथे पोहोचले होते. तिथे या खासदारांची दोन तास बैठक झाली. त्यानंतर सर्वजण यशवंतराव चव्हाण सभागृहात पोहोचले. तिथे शिंदे सेनेचे नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.  त्यानंतर खासदारांच्या गळ्यात धनुष्यबाणाचे चिन्ह असलेले उपरणे घालून त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडला.  यावेळी बोलता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना हा एक परिवार आहे. या परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सहभागी झाले आहेत.

आता आमच्याकडे चार संजय आहेत. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेत उठाव झाला. तो उठाव पक्ष वाचण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव झाला. आपला लढा कट्टर हिंदुत्ववादी विचार जपण्याचा आहे. शिंदे पुढे म्हणाले की, संजय जाधव हे ग्रासरूटला काम करतात. हा जनतेशी घट्ट नाळ जपणारा खासदार आहे. संजय दिना पाटील हे बेधडक आहेत. दोस्ती यारी साठी उत्तम आहेत. संजय पाटील हे  दिनांचा कैवारी आहे. ओम राजे  हे मनाचे राजे आहेत. हे खासदार स्वार्थासाठी आलेले नाहीत तर मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आले आहेत. शिवसेना ठाण्यापुरती  मर्यादित असल्याचे म्हणत होते. पण शिवसेना चांदा ते बांदापर्यंत पोहोचली आहे. 60 आमदार निवडून आले आहेत. ही शिवसेना शब्द पाळणारी आहे. शिवसेना बळकट होत आहे.

हा मतदारांचा. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही. इथे एका परिवारातील म्हणून प्रश्न सोडवले जातात. कोणी  म्हणतात त्यांना  तुडवा, तर मला सांगायचे आहे की बाळासाहेबांनी आम्हाला  सांगितले आहे की, कोणी आडवे आले तर शिंगावर घ्या. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल. तुमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जाईल.  पुढच्या काळात जे  विकासासाठी आवश्यक आहे. ते देण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. आपली कामे होतील आणि अडचणी सुटतील. आपल्या विश्वासाला कदापिही तडा मी जाऊ देणार नाही. या खासदारांना 2029 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरच निवडून आणेन.

कृष्णा आष्टीकरांची उबाठातून हकालपट्टी
उबाठाकडून शिंदे गटात गेलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कृष्णा यांनी नांदेड मतदार संघातून उबाठाकडून विधान परिषद निवडणूक लढवली होती.  पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. खासदार नागेश आष्टीकर बंडखोरी करून शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्यानंतरही कृष्णा यांनी आपण उबाठामध्येच राहाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्यावर टीका करणार्‍या उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आज लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालात त्यांचा पराभव झाला असतानाच उबाठाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या