Home / महाराष्ट्र / Nashik Rain Update: नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा, ‘रेड अलर्ट’मुळे सप्तशृंगगड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद! शाळांना सुट्टी

Nashik Rain Update: नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा, ‘रेड अलर्ट’मुळे सप्तशृंगगड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद! शाळांना सुट्टी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घाटमाथ्याच्या परिसरात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. पुढील काही तासांत या...

By: Team Navakal
Nashik Rain Update: नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा, 'रेड अलर्ट'मुळे सप्तशृंगगड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद! शाळांना सुट्टी
Social + WhatsApp CTA

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घाटमाथ्याच्या परिसरात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. पुढील काही तासांत या भागात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून नाशिकसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः मध्यरात्री ११ वाजता त्र्यंबकेश्वर गाठले.

त्यांनी रात्री १२ वाजता वादळी वाऱ्यात मेटघर गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. डोंगराळ भागातील धोका लक्षात घेऊन मंत्र्यांच्या सूचनेनुसार मेटघर किल्ला परिसरातील २७ कुटुंबांमधील १०० पेक्षा जास्त नागरिकांना मध्यरात्रीच तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने आज, ७ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

सप्तशृंगगड आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान बंद; भाविकांना माघारी परतावे लागले

भाविकांची सुरक्षा आणि संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबाबत अत्यंत कडक पावले उचलली आहेत:

  • त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग: ढगफुटीच्या शक्यतेमुळे आज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांबून आलेल्या भाविकांची मोठी अडचण झाली. उत्तर प्रदेशातून लहान बाळासह भीमाशंकर, घृष्णेश्वरचे दर्शन घेऊन पहाटे ४:३० वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेल्या भाविकांना मंदिराचे दरवाजे बंद दिसल्याने दर्शन न घेताच डोळ्यात अश्रू आणून माघारी फिरावे लागले.
  • सप्तशृंगगडावर तीन दिवस बंदी: कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ७ ते ९ जुलै २०२६ या तीन दिवसांसाठी श्री सप्तशृंगगड, परिसरातील धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स आणि नदीकाठच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना व भाविकांना जाण्यास पूर्ण बंदी घातली आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड हा मुख्य घाटमार्गही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

धरणांमधून विसर्ग वाढवला; पालघरमध्येही १,००० लोकांचे स्थलांतर

नाशिक आणि इगतपुरी परिसरात पावसाचा जोर सतत वाढत असल्यामुळे जलसंपदा विभागाने जलसाठ्यांचे नियंत्रण सुरू केले आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून रविवारी रात्री १ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवण्यात आला आहे. हा विसर्ग १,६१४ क्युसेकवरून थेट ३,२२८ क्युसेक करण्यात आला असून गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकसोबतच वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात ३५० ते ४०० मिलीमीटर इतक्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. पालघरमधील एका धरणाच्या संरचनेचा भाग (पिचिंग) थोडा सरकल्यामुळे खबरदारी म्हणून तिथल्या आजूबाजूच्या १,००० नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पोलीस आणि SRPF सज्ज; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

सध्या नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि पेठ तालुक्यात स्थानिक प्रशासनासह पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नदी-नाले किंवा धोकादायक घाटांच्या दिशेने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या