Home / महाराष्ट्र / Nashik Vidhan Parishad : नाशिक विधान परिषद निवडणूक: नाट्यमय घडामोडींनंतर गोकुळ गीतेंचे बंड शमवण्यात महायुतीला यश

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधान परिषद निवडणूक: नाट्यमय घडामोडींनंतर गोकुळ गीतेंचे बंड शमवण्यात महायुतीला यश

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार...

By: Team Navakal
Nashik Vidhan Parishad
Social + WhatsApp CTA

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील बंडखोरीचे मोठे संकट दूर करण्यात अखेर वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. महायुतीसमोर तगडे आव्हान उभे करणारे अपक्ष बंडखोर उमेदवार गोकुळ गिते आज आपली बंडाची तलवार म्यान करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नाशिकमधील राजकीय वर्तुळात कमालीची गुप्तता पाळली जात असून, मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे संकटमोचक मानले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत हे विशेष विमानाने तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांनी थेट माजी उपमहापौर गणेश गिते आणि बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

गीते यांच्या निवासस्थानी ‘दराडे बंधूंना’ वेगळी जागा; चर्चेला उधाण-
मंत्री उदय सामंत हे गिते यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा तिथे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे हे देखील आधीच उपस्थित होते. मात्र, या भेटीदरम्यान एका वेगळ्याच दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिथे मंत्री उदय सामंत, गणेश गिते, गोकुळ गिते आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी बंडखोरी मागे घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाची चर्चा करत होते, त्या मुख्य खोलीत दराडे बंधूंना स्थान नव्हते. ते बाजूच्या दुसऱ्या खोलीत थांबून होते. महायुतीचे अधिकृत उमेदवार असूनही नरेंद्र दराडे यांना मुख्य चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

गोकुळ गिते यांच्या देहबोलीतून नाराजी स्पष्ट; स्वेच्छा की दबाव?
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मनधरणीच्या नाट्यमय प्रयत्नांनंतर गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या देहबोलीने (बॉडी लँग्वेज) अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. बैठकीदरम्यान गोकुळ गिते कमालीचे शांत आणि संथ दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव लपून राहिले नाहीत. त्यामुळे गिते हे हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेत आहेत की केवळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा शब्द राखण्यासाठी आणि वरिष्ठांच्या राजकीय दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागत आहे, अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे.

मुंबईतील बैठका आणि वरिष्ठ नेत्यांचा फोनवर पुढाकार-
नाशिकमध्ये मागील आठवड्याभरापासून मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. याच साखळीत मुंबईत गणेश गिते आणि गोकुळ गिते यांनी मंत्री उदय सामंत आणि भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चाललेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हे बंड शमवण्यात यश आले. वास्तविक पाहता, गिते बंधू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले होते. मात्र, हे दोन्ही सर्वोच्च नेते दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची थेट भेट होऊ शकली नाही. असे असले तरी, या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी फोनवरून केलेल्या थेट मध्यस्थीमुळे आणि दिलेल्या शब्दामुळेच हे बंड थंड झाल्याचे खात्रीलायकरीत्या बोलले जात आहे.

तांत्रिक अडचण कायम, तरीही दराडेंचा मार्ग सुकर
गोकुळ गिते यांनी आता निवडणूक रिंगणातून थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अधिकृत मुदत आधीच संपली असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गोकुळ गिते यांचे नाव आणि चिन्ह मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. परिणामी, ही निवडणूक प्रक्रिया आता पार पाडावीच लागणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या