Home / महाराष्ट्र / Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीच्या पाशवी अत्याचार अन् हत्या प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे दोषी! २९ जून २०२६ रोजी होणार अंतिम शिक्षेची घोषणा!

Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीच्या पाशवी अत्याचार अन् हत्या प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे दोषी! २९ जून २०२६ रोजी होणार अंतिम शिक्षेची घोषणा!

Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्याच्या...

By: Team Navakal
Nasrapur Case
Social + WhatsApp CTA

Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या मन सुन्न करणाऱ्या खटल्यात पुणे विशेष न्यायालयाने आज (२५ जून) अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने संशयित नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५ वर्षे) याला या प्रकरणात पूर्णपणे दोषी ठरवले आहे. जनआक्रोशानंतर हा खटला जलदगती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक कोर्ट) अत्यंत वेगाने चालवला, ज्यामुळे न्यायालयीन इतिहासात अत्यंत कमी कालावधीत सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर आल्याचे बोलले जात आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला असून, आरोपीला नेमकी कोणती शिक्षा ठोठावायची, याचा अंतिम निर्णय २९ जून २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे.

नेमकी काय होती घटना?
१ मे २०२६ रोजी नसरापूर येथे हा अत्यंत क्रूर आणि घृणास्पद गुन्हा घडला होता. ६५ वर्षांच्या भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला खाऊ देण्याच्या बहाण्याने फूस लावून एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने त्या निष्पाप बालिकेवर अत्यंत अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत चिमुरडीवर झालेल्या या पाशवी अत्याचाराची पुष्टी झाली होती. अत्याचार केल्यानंतर आपले कृत्य लपवण्यासाठी आरोपीने त्या बालिकेचा गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे खून केला. एवढ्यावरच न थांबता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या सखोल तपासणीनंतर पोलिसांनी भीमराव कांबळेचा माग काढत त्याला तात्काळ अटक केली होती.

विशेष न्यायालयात आरोपीचा बचावाचा केविलवाणा प्रयत्न
अंतिम सुनावणी दरम्यान विशेष न्यायालयात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळे याला थेट प्रश्न विचारला की, “तुझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले आहेत, आता तुला कोणती शिक्षा द्यायची? फाशीची की जन्मठेपेची?” यावर आरोपीने न्यायालयात स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

तो म्हणाला, “त्या दिवशी मी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. चालताना अचानक माझा पाय घसरला आणि मी पडलो. माझ्यासोबत ती मुलगीही पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. ती रडू लागल्यामुळे मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.”

आरोपीचा हा खोटा बनाव न्यायाधीशांनी तात्काळ फेटाळून लावला. विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याला कडक शब्दात सुनावले की, “तू जे सांगत आहेस तो आता इतिहास झाला आहे. वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे तुझ्यावर हा गंभीर गुन्हा न्यायालयात पूर्णपणे सिद्ध झाला आहे.” न्यायाधीशांच्या या चोख उत्तरानंतर आरोपी पूर्णपणे निरुत्तर झाला.

विविध कलमांखाली गुन्हा सिद्ध: दोन कलमांमध्ये फाशीची तरतूद
या खटल्याची सुनावणी विविध कायदेशीर कलमांखाली पार पडली, ज्यामध्ये पोक्सो (POCSO) कायदा आणि हत्येच्या कलमांचा समावेश होता. सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेले पुरावे, साक्षीदार आणि वैद्यकीय अहवाल इतके भक्कम होते की, आरोपीवरील सर्वच्या सर्व गुन्हे न्यायालयाने सिद्ध मानले. आरोपीवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांपैकी दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या (मृत्यूदंड) शिक्षेची कायदेशीर तरतूद आहे. तर अन्य कलमांनुसार एका गुन्ह्यात १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि एका कलमाखाली आजन्म जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

‘नराधमाला फाशीच द्या’; सरकारी वकिलांचा आक्रमक युक्तिवाद
न्यायालयात दोन्ही बाजूंनी अंतिम शिक्षेवर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी आरोपीला कठोर सुरक्षा आणि समाजस्वास्थ्याचा हवाला देत मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची आग्रही मागणी केली. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “भीमराव कांबळे याने त्या निष्पाप आणि असहाय्य जिवासोबत तब्बल ३९ मिनिटे अत्यंत घृणास्पद आणि क्रूर कृत्य केले आहे. वैद्यकीय तपासणीतही तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे भीषण वास्तव समोर आले आहे. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) या श्रेणीत मोडतो.”

सरकारी पक्षाने पुढे असा युक्तिवाद केला की, जर अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली नाही, तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि भविष्यात तो पुन्हा असे कृत्य करण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे या नराधमाला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी.

२९ जूनला अंतिम फैसला
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सरकारी पक्षाची मागणी ऐकून घेतल्यानंतर आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला नेमकी कोणती आणि किती वर्षांची शिक्षा होणार, याचा फैसला आता चार दिवसांनी म्हणजेच २९ जून रोजी जाहीर केला जाईल. या संवेदनशील प्रकरणातील न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील ४८ तासांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ‘हा’ अंदाज नक्की वाचा- राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी