Home / महाराष्ट्र / NCP Sunil Tatkare : दिल्लीत राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा! तटकरे-पटेलांच्या गटातील बड्या नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं; नेमकं काय घडलं?

NCP Sunil Tatkare : दिल्लीत राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा! तटकरे-पटेलांच्या गटातील बड्या नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं; नेमकं काय घडलं?

NCP Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अंतर्गत वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आता दिल्लीपर्यंत...

By: Team Navakal
NCP Sunil Tatkare 
Social + WhatsApp CTA

NCP Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अंतर्गत वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आता दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यानंतर ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, दिल्लीतील पक्ष कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले असून, त्यांना कार्यालयात रोखून धरत जाब विचारण्यात आला.

ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यावर नेमका आरोप काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचे नाव वगळण्यात आल्याने ते प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नाराजीपोटी श्रीवास्तव यांनी दिल्लीतील माध्यमांच्या प्रतिनिधींना काही संदेश (मेसेज) पाठवले होते. यामध्ये त्यांनी पक्षात केवळ नातेवाईकांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप करत पवार कुटुंबावर गंभीर टीका केली होती. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाचे अधिकृत संपर्क प्रमुख असताना त्यांनी पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाची बदनामी केल्याचा ठसा उमटवत युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीवास्तव यांना पक्ष कार्यालयात जाण्यापासून रोखले आणि “पक्षाची बदनामी का करत आहात?” असा सवाल करत त्यांना धारेवर धरले.

तटकरे आणि पटेल यांच्या ‘साईडलाईन’ प्रकरणाची पार्श्वभूमी
पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांना डच्चू देण्यात आल्याची आणि सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्याने या ज्येष्ठ नेत्यांची रवानगी अडगळीत झाल्याची कुजबुज सुरू आहे. याच अंतर्गत वादाचा फायदा घेत श्रीवास्तव यांनी तटकरे आणि पटेल यांच्या गटातील नेत्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर आता पक्षाच्या अधिकृत गोटातून सारवासारव सुरू झाली आहे.

“तटकरे-पटेल यांना प्रवेश नाकारल्याच्या चर्चा निराधार” – धीरज शर्मा
दिल्लीतील कार्यालयात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याने असे कृत्य केलेले नाही. काही हितशत्रू जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. संपूर्ण पक्ष पार्थ पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहे.”

आगामी राजकीय परिणाम
दिल्लीतील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस आता लपून राहिलेली नाही. ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाने दिलेली तंबी आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील संताप हा पक्षात सुरू असलेल्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग मानला जात आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या