Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे स्थानिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न होता अधिक गुंतागुंत निर्माण झाल्याने, डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील एका प्रगत खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे.
दोन दिवसांपासून सुरू होते उपचार-
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार निलेश लंके यांना गेल्या काही दिवसांपासून शारीरिक अस्वस्थता जाणवत होती. अहिल्यानगरमध्येच त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने समर्थकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले. लंके यांचा जनसंपर्क मोठा असल्याने त्यांच्या प्रकृतीचे वृत्त समजताच जिल्हाभरातून त्यांचे कार्यकर्ते चौकशीसाठी धाव घेत आहेत.
पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार-
अहिल्यानगरमधील डॉक्टरांनी प्रकृतीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीची तपासणी करेल. अहिल्यानगर ते पुणे या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची आपत्कालीन स्थिती उद्भवू नये, यासाठी डॉक्टरांचे एक विशेष पथक रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत तैनात करण्यात आले आहे.
समर्थकांमध्ये चिंतेचे सावट-
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निलेश लंके यांचा विविध कार्यक्रमांमधील वावर वाढला होता. सततचे दौरे आणि कामाचा ताण यामुळे प्रकृतीवर परिणाम झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून कोणतेही अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत.










