Sanjay Gandhi National Park : मुंबईची शान ओळखल्या जाणाऱ्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे (SGNP) नाव बदलून ते “भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान” करावे, असा प्रस्ताव राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे बोरीवली येथील या विस्तीर्ण उद्यानाच्या ओळखीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्यासोबतच प्रस्तावित विद्यापीठाच्या मुद्द्यावरून प्रशासकीय स्तरावर खलबते सुरू झाली आहेत.
नामकरणाचा प्रस्ताव आणि तांत्रिक शिफारस
प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी पाठवलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, उद्यानाचे नाव बदलणे हा सर्वस्वी धोरणात्मक निर्णय असून राज्य सरकारने योग्य स्तरावर त्याचा विचार करावा. मात्र, नामकरण करताना एक महत्त्वाची तांत्रिक सूचनाही करण्यात आली आहे. उद्यानाच्या नावातील “राष्ट्रीय उद्यान” (National Park) हा शब्द तसाच कायम ठेवावा, जेणेकरून या क्षेत्राच्या वैधानिक संरक्षणाबाबत आणि ‘संरक्षित क्षेत्र’ (Protected Area) म्हणून असलेल्या त्याच्या दर्जाबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.
उद्यानाच्या आवारात विद्यापीठ स्थापण्यास वन विभागाचा विरोध
नामकरणाच्या प्रस्तावासोबतच, उद्यानाच्या परिसरात “भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जागतिक दर्जाचे विद्यापीठ” स्थापन करण्याचा विचारही मांडण्यात आला होता. मात्र, वन विभागाने या प्रस्तावावर अत्यंत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक अधिसूचित क्षेत्र असून ते मुंबई महानगर क्षेत्रातील वन्यजीवांचे अत्यंत महत्त्वाचे अधिवास केंद्र आहे. उद्यानाच्या आत शैक्षणिक संस्था उभारणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरू शकते, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्याचा दाखला
वन विभागाने आपल्या पत्रात चेतावणी दिली आहे की, उद्यानामध्ये विद्यापीठ स्थापन केल्यास मोठ्या प्रमाणावर बांधकामे, वाहतूक पायाभूत सुविधा, मानवी वावर आणि दीर्घकालीन संस्थात्मक वापर वाढेल. या सर्व गोष्टींमुळे जमिनीच्या मूळ स्वरूपात बदल होऊन वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होईल. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि वन संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार अशा प्रकारच्या व्यावसायिक किंवा संस्थात्मक उपक्रमांना राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत परवानगी देता येत नाही. त्यामुळे, अधिसूचित क्षेत्रात विद्यापीठ उभारण्याची शिफारस विभाग करू शकत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले आहे.
पर्यायी जागेचा सल्ला
सरकारला जर खरोखरच असे जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करायचे असेल, तर त्यासाठी उद्यानाच्या हद्दीबाहेरील आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील नसलेल्या इतर जागांचा शोध घ्यावा, असा मोलाचा सल्ला वन विभागाने दिला आहे.










