Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : रोहित पवारांचे आंदोलन संपताच भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनस्थळाचे ‘गोमूत्र शुद्धीकरण’; पंढरपुरात राजकीय वातावरण कमालीचे तापले!

Rohit Pawar : रोहित पवारांचे आंदोलन संपताच भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनस्थळाचे ‘गोमूत्र शुद्धीकरण’; पंढरपुरात राजकीय वातावरण कमालीचे तापले!

Rohit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे पुकारलेल्या...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे पुकारलेल्या दोन दिवसीय अन्नत्याग आंदोलनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे. रोहित पवार यांच्या या आंदोलनाची दखल अखेर राज्य सरकारला घ्यावी लागली आणि राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, हे आंदोलन संपल्यानंतर या ठिकाणी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

आंदोलनस्थळाचे भाजप कार्यकर्त्यांकडून ‘शुद्धीकरण’
आमदार रोहित पवार यांनी ज्या ठिकाणी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले, त्याच पवित्र पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या आंदोलनस्थळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माउली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळावर गोमूत्र शिंपडून परिसर ‘स्वच्छ’ केला.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी आणि रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “या राजकीय आंदोलनामुळे पंढरपूरचे पावित्र्य भंग पावले असून विठ्ठलाची ही भूमी अशुद्ध झाली आहे,” असा अजब दावा माउली हळणवर यांनी केला. या आंदोलनामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली, असा आरोप करत या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.

“बीएमडब्ल्यू” कारवरून विरोधकांकडून टीका आणि कौटुंबिक भावूक क्षण
रोहित पवार यांचे हे आंदोलन सुरू असताना, विरोधकांनी मात्र त्यांच्यावर ‘नाटकबाजी’ करत असल्याचा घणाघाती आरोप केला. “जे लोक स्वतः कोट्यवधी रुपयांच्या ‘बीएमडब्ल्यू’ (BMW) सारख्या आलिशान गाड्यांमधून फिरतात, त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या नावावर उपोषण करणे म्हणजे केवळ राजकीय हास्यास्पद प्रकार आहे,” अशी टीका सोशल मीडिया आणि विरोधी नेत्यांकडून करण्यात आली.

दुसरीकडे, या दोन दिवसांच्या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांची मुले त्यांना भेटण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचली होती. उन्हातान्हात आपल्या वडिलांना अशा कठीण परिस्थितीत अन्नत्याग करताना पाहून त्यांच्या मुलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे मन हेलावून गेले होते.

सक्षणा सलगर यांचा भाजपवर घणाघाती प्रहार
या संपूर्ण गोमूत्र प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या सक्षणा सलगर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,

“मला या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटते की, भाजपमधील देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून हे लोक समाजात नेमके काय सिद्ध करू पाहत आहेत? सध्या देशामध्ये पेपर फुटीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे, त्यावर या नेत्यांनी बोलायला हवे. परंतु, ज्वलंत मुद्द्यांवर बोलण्याची या लोकांची पात्रता उरलेली नाही.”

सलगर यांनी पुढे स्पष्ट केले की, रोहित पवार यांनी केलेले हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक किंवा पक्षीय स्वार्थासाठी नव्हते, तर ते राज्यातील पिचलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होते आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.

“शरद पवारांचे कार्य सूर्यासारखे लख्ख”
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील टीकेचा समाचार घेताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, शरद पवार यांचे देशातील आणि राज्यातील योगदान हे सूर्यासारखे लख्ख आहे. कोणीही उठून त्यांच्यावर चिखलफेक करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, ज्याने थुंकणाऱ्याचेच तोंड खराब होते.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या