Rustom Ice Cream Shut Down: मुंबईकरांच्या आणि पर्यटकांच्या मनावर अनेक दशकांपासून राज्य करणाऱ्या चर्चगेट येथील प्रसिद्ध Rustom Ice Cream पार्लरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी या आयकॉनिक आईस्क्रीम पार्लरचे लायसन्स तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही धाडसी कारवाई करण्यात आली. प्रयोगशाळेचा अंतिम तपासणी अहवाल येत नाही, तोपर्यंत हे दुकान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
उंदीर-माश्यांचा सुळसुळाट अन् कालबाह्य फ्लेवर्सचा वापर
औचित्य तपासणीसाठी गेलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना या आईस्क्रीम पार्लरमध्ये स्वच्छतेचा पुरता बऱ्याच अंशी अभाव दिसून आला. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान खालील गंभीर बाबी समोर आल्या आहेत:
- अस्वच्छतेचे साम्राज्य: आईस्क्रीम तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या जागेत जिवंत उंदीर आणि माश्यांचा सुळसुळाट आढळला.
- कोल्ड चेनमध्ये त्रुटी: आईस्क्रीम सुरक्षित आणि योग्य तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन सिस्टीम राखण्यात हे पार्लर अपयशी ठरले.
- एक्स्पायर्ड केमिकल्स जप्त: आईस्क्रीममध्ये चव आणण्यासाठी वापरले जाणारे अनेक कालबाह्य (कृत्रिम फ्लेवर्स आणि इसेन्स तिथे आढळून आले. यामध्ये पिस्ता, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट आणि रम जमैका अशा फ्लेवर्सचा समावेश होता. हा सर्व साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
FSSAI च्या मानकांपेक्षा फॅटचे प्रमाण कमी
प्रशासनाने केवळ अस्वच्छतेवरच नाही, तर आईस्क्रीमच्या दर्जावरही बोट ठेवले आहे. यापूर्वी बाह्य प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, रुस्तम आईस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण अवघे 7.94 टक्के आढळले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार, कोणत्याही अस्सल आईस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण किमान 10 टक्के असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. त्यामुळे हे आईस्क्रीम सरकारी निकषांच्या कसोटीवरही निकृष्ट दर्जाचे ठरले आहे.
अहवाल येईपर्यंत विक्रीवर पूर्ण बंदी
अन्न सुरक्षा अधिकारी तेजस्विनी व्ही. पाटील आणि आकाश चव्हाण यांनी सह-आयुक्त पी. आर. सिंगारवाड आणि सहाय्यक आयुक्त अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी पूर्ण केली.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जप्त केलेल्या आईस्क्रीमचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. दक्षिण मुंबईतील अत्यंत लोकप्रिय असलेल्या या ब्रँडवर झालेल्या कारवाईमुळे मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.










