Home / महाराष्ट्र / Sanjay Dina Patil : प्रतिक्रिया विचाराल तर मारून पाठवेन ! बेताल संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ

Sanjay Dina Patil : प्रतिक्रिया विचाराल तर मारून पाठवेन ! बेताल संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ

Sanjay Dina Patil : उबाठातून फुटून नुकतेच शिंदे सेनेत गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज आपल्या मग्रुरीचे अत्यंत संतापजनक...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Sanjay Dina Patil : उबाठातून फुटून नुकतेच शिंदे सेनेत गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज आपल्या मग्रुरीचे अत्यंत संतापजनक दर्शन घडवले. प्रतिक्रिया विचारायला आलेल्या पत्रकारांना त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह, अर्वाच्च आणि असंसदीय भाषा वापरत शिवीगाळ केली. पुन्हा माझ्याकडे प्रतिक्रिया विचारायला आलात तर मारून पाठवेन, हे सर्व मी पोलिसांच्या समोर बोलत आहे. रेकॉर्ड करून घ्या आणि मुंबईच्या पोलीस आयुक्ताला जाऊन दाखवा. काय करायचे ते करून घ्या, अशी धमकीही त्यांनी दिली. आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचे भानही त्यांनी बाळगले नाही. आणखी संतापजनक बाब अशी की, त्यांच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांची अप्रत्यक्ष पाठराखणच केली. संजय पाटील यांच्या बेताल वर्तनामुळे खळबळ माजली असून, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची पातळी आणखी किती घसरणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.


उबाठातून फुटून शिंदे गटात गेले तेव्हा संजय दिना पाटील म्हणाले होते की, माझ्या विरोधात आंदोलन कराल तर बॉम्ब टाकेन, माझ्या नादी लागू नका, आम्ही भाडोत्री गुंडांकडून असली कामे करून घेत नाही, आम्ही स्वतः करणारे लोक आहोत. याआधी पाच जणांना आम्ही संपवले आहे. ज्याचा आजोबा जिवंत असेल तर त्याने त्याला विचारावे.  संजय राऊत यांनी याबाबत आज मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून संजय पाटील यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यान्वये (यूएपीए) कारवाई करण्याची मागणी केली. याची माहिती पत्रकार परिषदेत देताना संजय राऊत म्हणाले की, संजय दिना पाटील यांनी पाच जणांचे खून केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात केले होते, त्या पाच जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले होते का, त्या खुनाबद्दल पोलिसांनी संजय पाटील यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता का? नोंदवला असेल तर त्याचे पुढे काय झाले याचा तपासझाला पाहिजे.


राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला संजय पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तरे देत होते. मात्र तुम्ही उबाठाशी बंडखोरी करून बाहेर पडलात, पण तुमच्या कन्या राजुल पटील या आजही उबाठाच्या नगरसेविका आहेत. त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच संजय पाटील यांचा तोल सुटला. तिने (राजुल पटेल) तुम्हाला तिची भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे ना, तुम्ही मला परत परत का विचारता असे म्हणत पाटील यांनी पत्रकारांना आईवरून शिव्या देण्यास सुरुवात केली. तुमची इज्जत करतो. इज्जतीत राहा, माझ्या **मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला खायला घातले आहे. परत प्रतिक्रिया घेण्यासाठी माझ्या घरी याल तर मारून पाठवेन. मी खासदार आहे हेसुद्धा विसरून जाईन, हे मी पोलिसांसमोर बोलतोय काय उखडायचे ते उखडा, व्हिडिओ काढा आणि त्या पोलीस आयुक्ताला पाठवा, असे संजय दिना पाटील बरळले. त्यांच्या या अर्वाच्च शिवीगाळीचा व्हिडिओ माध्यमांवर येताच खळबळ उडाली. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित केले. एका लोकप्रतिनिधीच्या तोंडी अशी शिवराळ भाषा शोभते का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. यासंदर्भात सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी केली. तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पार रसातळाला गेली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.


संतप्त पत्रकारांनी विधिमंडळाच्या आवारात शिंदेगटाच्या नेत्यांना गाठून संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता आमदार बच्चू कडू, आ.प्रकाश सुर्वे आणि आ.संजय शिरसाट यांनी संजय पाटील यांच्या वतीने माध्यमांची माफी मागितली. मात्र त्याचवेळी संजय दिना पाटील यांचा तोल घसरला. त्याला सर्वस्वी संजय राऊतांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पाटील यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री फडणवीस आज दोन वेळा माध्यमांसमोर आले. सर्वप्रथम सकाळी संजय राऊत यांच्या पत्राबद्दल माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी हे प्रकरण हसण्यावारी नेले. कोणच्याही घरावर बॉम्ब पडू दिला जाणार नाही. कुणाच्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाही. कोणी चुकीचे वागले बोलले असेल तर योग्य ती कारवाई करायला पोलीस सक्षम आहेत, असे ते म्हणाले. मात्र त्यानंतर घडलेल्या घडामोडी आणि संजय पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याने मोठा वादंग उठताच दुसर्‍यांदा माध्यमांसमोर येताना फडणवीस यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला. मी नुकताच नागपूरहून आलो आहे. त्यामुळे याबद्दलची मला पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन मी तुमच्याशी नंतर बोलतो, असे फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी संजय पाटील यांची अप्रत्यक्ष पाठराखणच केली. त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता पाटील यांच्या त्राग्याला तेच कसे कारणीभूत ठरले हे सांगण्याचा प्रयत्न केला. रोज त्यांच्याविरुध्द अत्यंत खालच्या दर्जाचे नीच शब्द वापरणे. तोडून टाका काय, घरात घुसून मारा असे रोज मीडियासमोर सुरू होते. खरे तर हासुध्दा मीडियाचा अपमान आहे. त्याचा राग पाटील यांच्या मनात खदखदत होता. त्यामुळे त्यांच्या तोंडून काही अपशब्द बाहेर पडले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला सांगतो. एरवी संजय पाटील यांचे पत्रकारांशी संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले आहेत. त्यांचा पत्रकारांवर मुळीच राग नव्हता. पत्रकारांविषयी असे वक्तव्य कोणीही करू नये. मी अशा गोष्टींचे समर्थन करत नाही, असे शिंदे म्हणाले.


हा सर्व गदारोळ सुरू असताना संध्याकाळी पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली. गद्दारांना शिवी देणे आणि एखाद्याला मारून टाकण्याची धमकी देणे यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. हे जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांची अक्कल कुठे गहाण पडली आहे याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमायला हरकत नाही. गद्दार या शब्दाला मराठी पर्यायी शब्द नाही. गद्दाराला गद्दारच म्हणणार. त्याला महात्मा, आचार्य किंवा सत्यवादी असे शब्द पर्याय ठरू शकत नाहीत. गद्दार ही जर कुणाला शिवी वाटत असेल तर मराठी शब्द रचनाकार बदलावा लागेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा उल्लेख कर्तबगार, निष्पक्ष पोलीस अधिकारी असा करत राऊत यांनी त्यांनाही टोमणा मारला. संजय पाटील यांच्या या वक्तव्याचा मुंबई आणि ठाण्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध केला. वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांची संघटना टीव्हीजे, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब या संघटनांनी पाटील यांचा जाहीर निषेध केला. तर ठाण्यात पत्रकारांनी तोंडाला काळ्या फिती लावून पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली.

जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण
तो गुंड प्रवृत्तीचा नाही

संजय पाटील माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. तो गरम डोक्याचा आहे. कुणाचे ऐकणारा नाही. त्याचे वडील मोठे नेते, आईदेखील कर्तृत्ववान. तो लहानपणापासून लाडात वाढलेला आहे. तो जे काही बोलला ते योग्य नाही. मला वाटते उबाठातून सहा खासदार फुटल्याचे महाराष्ट्रातील जनतेला रुचलेले नाही. अशा प्रकारच्या गद्दारीला लोक प्रचंड वैतागले आहेत. लोकांकडून आता प्रचंड विरोध होईल, हे संजयला समजले असावे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच तो बोलू नये ते बोलून गेला. एरवी तो गुंड प्रवृत्तीचा माणूस नाही, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या