Nasrapur atrocities : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुरडी लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी आज जलदगती न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला सर्व चारही गुन्ह्यांत दोषी ठरवले. सरकार पक्ष आणि बचाव पक्ष अशा दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आज पूर्ण झाले. न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून, सोमवारी 29 रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनीच पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षे वयाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. संतप्त नागरिकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून रास्तारोको करत नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी आग्रही मागणी केली होती. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटल्याची सुनावणी वेगाने होऊन लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला. अवघ्या चौदा दिवसांत पोलिसांनी 1100 पानांचे आरोपपत्र सादर केले आणि 55 दिवसांत हा खटला अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला. एवढ्या जलदगतीने एखाद्या खटल्याची सुनावणी होण्याचा हा एक विक्रम ठरला आहे.
आरोपी भीमराव कांबळे याच्याविरूद्ध पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी पहिल्या दोन गुन्ह्यांत आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तिसर्या गुन्ह्यात 14 वर्षे जन्मठेपेची तर चौथ्या गुन्ह्यात आजीवन कारावासाच्या शिक्षेचीतरतूद आहे.आज विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल दिला की, सर्व परिस्थितीजन्य पुरावे, फोरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यावरून आरोपीवर ठेवण्यात आलेले चारही आरोप सिध्द झाले आहेत. त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यावर आरोपीने आपला बचाव करण्यासाठी पुन्हा आधी कहाणी सांगत म्हटले की, त्या दिवशी मी त्या मुलीला गाईचे वासरू दाखवण्यासाठी गोठ्याकडे घेऊन चाललो होतो. तेवढ्यात पाईपमध्ये पाय अडकून मी पडलो. त्यात मुलीला जखमा झाल्या. ती रडू लागली. त्यामुळे माझ्यावर आरोप लागू नये म्हणून तिला तिथेच सोडून मी निघून गेलो, मी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नाही आणि तिची हत्याही केलेली नाही. आरोपी पुन्हा एकदा हेच सांगत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याची ही बडबड ऐकून तिथेच बसलेली चिमुरडीची आई व आजी यांना रडू कोसळले.
आरोपीच्या वकिलाने आरोपीच्या वयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. मात्र सरकारी वकील अॅड. अजय मिसार यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद अमान्य करत आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. आरोपीची लैंगिक सक्षमता चाचणी (पोटेन्सी टेस्ट) आणि शारीरिक चाचणी करण्यात आली असून, या दोन्ही चाचण्यांचे अहवाल आले आहेत. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. आरोपीने याआधीदेखील दोन वेळा महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातून तो सुटला. मात्र त्याने तिसर्यांदा तशाच प्रकारे वासनांध कृत्य केल्यामुळे आरोपीच्या बचावासाठी त्याचे कुटुंबीयदेखील आज न्यायालयात आलेले नाहीत. आरोपीच्या चेहर्यावर केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाची साधी रेषही दिसत नाही. थंड डोक्याने आरोपीने हे कृत्य केले आहे. आरोपीला 7 मुले आणि पत्नी आहे. मात्र तो त्यांच्यासोबत राहत नव्हता. कुटुंबियांनी त्याला बेदखल केले होते. तो उघड्यावर राहत होता. त्याच्यामध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. तो सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे. अशा प्रवृत्ती समाजामध्ये राहणे घातक आहेत. आरोपी दया दाखवण्याच्या बिलकूल लायकीचा नाही, असा युक्तिवाद अॅड. मिसार यांनी केला.
सुनावणीनंतर सरकारी वकील अॅड. अजय मिसार आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयात झालेल्या सुनावणीची सविस्तर माहिती दिली. या खटल्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुरावे, न्यायवैद्यक तपासणीचा (फोरेन्सिक) अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे उभा राहिला. तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या पुराव्यांच्या आधारे कायद्याला जे अपेक्षित आहे त्या पध्दतीने कोणताही दुवा मागे सुटू न देता आरोपपत्र दाखल केले.तपासात पोलिसांनी एकूण 82 साक्षीदारांचे जबाब घेतले होते. त्यापैकी 55 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले होते. अवघ्या सोळा दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले. पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64 (बलात्कार). 65(2), 103 (1) (खून करणे), 173(2) (अपहरण), 140 (1) (खुनाच्या इराद्याने अपहरण) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारासंबंधीच्या पोक्सो कायद्याच्या कलम 4,6,8 आणि 12 अन्वये गुन्हे दाखल केले होते. हे सर्व गुन्हे सरकार पक्षाने न्यायालयासमोर निःसंशयपणे सिध्द करून दाखवले. आरोपीने कलम 351 अन्वये नोंदवलेल्या जबाबाचा पुनरुच्चार करत स्वतःवरील आरोप नाकारले. त्यामुळे सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान आरोपीने अत्यंत थंड डोक्याने गंभीर आणि नीच कृत्य केले आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला आणि पुराव्यानिशी तो सिध्द करून दाखवला, असे अॅड. मिसार यांनी सांगितले.
दरम्यान, पीडित चिमुरडीची आई, आजी आणि वडील आज न्यायालयात आले होते. जेव्हा आरोपी न्यायालयात आपला बचाव करताना खोटे सांगत होता तेव्हा ते ऐकून पीडितेच्या आईला रडू आवरले नाही. ती घळघळा रडू लागली. तर पीडितेच्या वडिलांनी हात जोडत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली. आपल्या मुलीच्या वाट्याला आले तसे दुर्दैव अन्य मुलींच्या वाट्याला येऊ नये असे वाटते. त्यामुळे नराधमाला फाशीचीच शिक्षा योग्य आहे, असे पीडितेच्या वडिलांनी न्यायालयात सांगितले.









