Sanjay Raut Target Rebels: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि बंडखोर नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील भांडुप येथील सभेत बोलताना पक्षाशी फारकत घेणाऱ्या खासदारांवर आणि प्रामुख्याने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला.
मराठी माणसाशी आणि महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्यांना दिसेल तिथे आणि हातात जे असेल त्याने झोडपून काढा, असे थेट आवाहन राऊत यांनी शिवसैनिकांना केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आज जे नेते स्वतःला मोठे समजत आहेत, ते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळे आमदार-खासदार झाले आहेत. शिवसेनेने रक्ताचे पाणी करून ज्यांना गटारातून थेट गंगेत नेले, त्यांनीच पक्षाच्या पाठीत सुरा खुपसला आहे. मतदारांनी मूळ शिवसेनेला आणि मशालीच्या चिन्हाला भाजप तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केले होते. हा लाखो मतदारांचा अपमान असून, बंडखोरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, शिवसैनिक त्यांना पराभूत केल्याशिवाय शांत बसणार नाहीत.
“तुमच्या डीएनएमध्येच गडबड”; संजय दिना पाटील यांच्यावर जहरी टीका
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी त्यांच्या जुन्या पक्षांतराचा इतिहास काढत गंभीर आरोप केले:
- पहिली पळकाढू भूमिका: जेव्हा जेव्हा शिवसेना संकटात आली, तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वात आधी पळ काढला. शिवसैनिकांनी तुम्हाला अथांग प्रेम, आदर आणि मान-सन्मान दिला, तुमच्या मुलीला नगरसेवक केले आणि तुम्हाला खासदारकी दिली, पण तुम्ही पक्षाला धोका दिला.
- गंगेतून गटारात प्रवास: उद्धव ठाकरे यांनी नेहमीच मोठ्या मनाने अशा लोकांना पदे दिली, पण यांच्या रक्तामध्ये आणि डीएनएमध्येच गडबड आहे. त्यामुळेच ही माणसे गंगेतून पुन्हा गटारात गेली असून, इतिहासात त्यांची नोंद केवळ ‘गद्दार’ म्हणूनच होईल.
“आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू”; सुरक्षेवरून लगावला टोला
संजय राऊत यांनी बंडखोरांच्या ‘ऑपरेशन टायगर’चा समाचार घेताना सांगितले की, वाघाच्या कातडीत वावरणारे हे लोक आता लांडग्यांच्या कळपात सामील झाले आहेत. ईशान्य मुंबईतील आणि विशेषतः भांडुपमधील शिवसैनिकांच्या मनात या गद्दारीबद्दल प्रचंड संताप आहे. आता शिवसेनेने ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू केले असून, गद्दारीचा सूड घेतला जाईल.
बंडखोर खासदारांना मिळालेल्या व्हीआयपी सुरक्षेवरून टोला लगावताना राऊत म्हणाले की, तुम्हाला हवी तितकी वाय प्लस सुरक्षा सोबत बाळगा. परंतु, जनतेच्या न्यायालयात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिवसेनेचा खरा राडा काय असतो हे तुम्हाला समजेल. आगामी काळात ईशान्य मुंबईचा पुढचा खासदार हा केवळ शिवसेनेच्या मशालीचाच असेल, असा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केला.









