Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : ‘ओह माय फ्रेंड मेलोनी…’; संजय राऊतांनी थेट केली पंतप्रधान मोदींची नक्कल- मेलोनींसोबतच्या सेल्फीवरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार

Sanjay Raut : ‘ओह माय फ्रेंड मेलोनी…’; संजय राऊतांनी थेट केली पंतप्रधान मोदींची नक्कल- मेलोनींसोबतच्या सेल्फीवरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून इटलीमध्ये त्यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट जागतिक...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असून इटलीमध्ये त्यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावरून पंतप्रधानांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान परदेशात जाऊन सेल्फी काढण्यात मग्न आहेत, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस त्यांच्यात नाही, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

“ओह माय फ्रेंड मेलोनी”: राऊतांनी उडवली पंतप्रधानांची नक्कल
पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोदींची मिमिक्री (नक्कल) केली. “ओह माय फ्रेंड मेलोनी” अशा शब्दांत पंतप्रधानांना चिमटा काढत राऊत म्हणाले की, मेलोनी या पंतप्रधानांच्या मैत्रीण असू शकतात, मात्र या देशातील जनता आणि प्रश्न विचारणारे पत्रकार त्यांचे मित्र होऊ शकले नाहीत. नॉर्वेमधील एका महिला पत्रकाराने जेव्हा भारतातील मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्न विचारला, तेव्हा पंतप्रधान उत्तर न देता तिथून निघून गेले, असा दावा राऊत यांनी केला. “पंतप्रधान जगाला काटकसरीचा उपदेश करतात, मग स्वतः सात-सात देशांचे दौरे करून काय साध्य करत आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण
भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन होत असल्याचा आरोप करताना संजय राऊत यांनी ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’चा (जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक) दाखला दिला. “एकेकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अग्रेसर असलेला भारत आज १५७ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे, याला केवळ नरेंद्र मोदींचे सरकार जबाबदार आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांनी देशात एकही खुली पत्रकार परिषद घेतली नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जर असाच प्रश्न भारतातील एखाद्या पत्रकाराने विचारला असता, तर त्याच्यावर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून संबंधित वाहिनीचा परवाना रद्द केला असता, असेही ते पुढे म्हणाले.

शरद पवारांच्या भूमिकेशी असहमती
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. मात्र, संजय राऊत यांनी शरद पवारांच्या या विधानाशी स्पष्ट असहमती दर्शवली आहे. राऊत म्हणाले की, “देशाची प्रतिष्ठा जपणे हे पंतप्रधानांचे कर्तव्यच आहे, पण इंदिरा गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान देखील परदेशात जात होते. ते कधीही पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळ काढत नसत. जो नेता स्वतःला ‘विश्वगुरू’ मानतो आणि लोक ज्यांना विष्णूचा अवतार मानतात, त्यांनी अशा प्रकारे प्रश्नांना घाबरून पळणे हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद आहे.”

मानवी हक्कांच्या उल्लंघनावर प्रहार
भारतातील विविध राज्यांमध्ये, विशेषतः गुजरातच्या कारागृहात अनेक निष्पाप लोक अडकून पडले आहेत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, हे आता जगाला समजले आहे, असा दावाही राऊत यांनी केला. “ज्याला काहीतरी लपवायचे असते, तोच प्रश्नांपासून पळतो. पंतप्रधान मोदी कोणालाही विश्वासात न घेता धोरणे राबवत आहेत,” असे म्हणत राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, शरद पवार यांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले असले तरी, राऊत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या छटा पाहायला मिळत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या