Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतलेल्या अल्प विश्रांतीनंतर आज साताऱ्याच्या भूमीतून आपल्या सार्वजनिक कामाची पुन्हा जोमाने सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर खासदारकीची शपथ घेतल्यापासून शरद पवार काही काळ सक्रिय राजकारणापासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र, आज साताऱ्यात पार पडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत त्यांची सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडीनंतर संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य आणि बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी घालून दिलेला तोच उदात्त आदर्श पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट उपसणारे सेवक आणि हितचिंतक यांच्यामुळेच आज या संस्थेची उंची जगभर पोहोचली आहे.”
रयत संस्थेत आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे (AI) युग
बदलत्या काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असा आग्रह शरद पवार यांनी यावेळी धरला. ते म्हणाले, “जग वेगाने बदलत असून नवीन संकल्पनांचे स्वागत करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील मुले आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर चर्चा करतात, ही अतिशय आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. रयत संस्थेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळावे, यासाठी परदेशातील नामवंत शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधण्याचा आमचा मानस आहे.”
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीचा ओघ
संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना बळ देण्यासाठी हितचिंतकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या प्राप्त होत असल्याचे पवार यांनी अभिमानाने नमूद केले. यावर्षी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. संस्थेचे हितचिंतक रामशेठ ठाकूर यांनी यावर्षी ३ कोटी रुपयांहून अधिक निधी संस्थेला दिला असून, अशा दातृत्वामुळेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सुसह्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीसमोर आणि रयत सेवकांपुढे एक चांगला आदर्श निर्माण करण्यासाठी संस्था भविष्यात नवनवीन प्रकल्प राबवणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.












