Shivsena UBT MP : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक आणि नाट्यमय घडामोडी समोर येत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणखी एका मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी तब्बल ६ ते ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. त्यातच दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेले पत्र आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची सोशल मीडियावरील पोस्ट, यांमुळे या खासदार फुटीच्या वृत्ताला आता अधिकृत बळ मिळाले आहे. रविवार, १४ जूनपासून सुरू झालेल्या या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
‘मातोश्री’वरील बैठकीत पडलेली फूट
या संपूर्ण सत्तानाट्याची ठिणगी रविवार, १४ जून रोजी पडली, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ येथे पक्षाच्या सर्व खासदारांची एक तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला पाच प्रमुख खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळले आणि त्यांनी केवळ ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली. प्रत्यक्ष उपस्थिती न लावणाऱ्या खासदारांमध्ये:
संजय देशमुख (यवतमाळ)
संजय जाधव (परभणी)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
यांच्या समावेश होता. दुसरीकडे, केवळ अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), अनिल देसाई (दक्षिण-मध्य मुंबई), संजय दिना पाटील (उत्तर-पूर्व मुंबई) आणि राजाभाऊ वाझे (नाशिक) हे चारच खासदार मातोश्रीवर प्रत्यक्ष उपस्थित होते. या अनुपस्थितीमुळेच खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना खऱ्या अर्थाने वेग आला.
संजय राऊत आणि महुआ मोईत्रा यांचे ‘सोशल मीडिया’ युद्ध
मंगळवारी, १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास माध्यम क्षेत्रांत खासदार फुटीच्या बातम्या तीव्रतेने झळकू लागल्यानंतर, रात्री ११ वाजता संजय राऊत यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स) देण्यात येत असल्याची माहिती अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद आहे!”
संजय राऊत यांच्या या पोस्टची दखल घेत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या पक्षातील नुकत्याच झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत उपरोधिक टोला लगावला. मोईत्रा यांनी लिहिले, “फक्त १५ कोटी? इतक्या कमी किमतीत का जात आहेत? आमच्या पक्षातील फुटिरांना प्रत्येकी ४ कोटी रुपये आणि पुढील ३६ महिन्यांच्या कार्यकाळात दरमहा १ कोटी रुपये मिळणार आहेत. हनी प्लस मनी.”
‘पचास खोके’ आणि मूळ किंमत
बुधवारी, १७ जून रोजी सकाळी संजय राऊत यांनी महुआ मोईत्रा यांच्या त्या पोस्टला सडेतोड उत्तर देत बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. राऊत यांनी लिहिले:
“अपना सपना मनी मनी! नाही नाही, महुआ जी, प्रत्येक खासदाराची किमान आधारभूत किंमत ५० कोटी रुपये (पचास खोके) ठरली आहे. १५ कोटी रुपये तर केवळ अॅडव्हान्स आहेत. खरे सांगायचे तर, वैयक्तिक पातळीवर त्यांची लायकी ५० हजार रुपयांचीही नाही. त्यांची किंमत आज केवळ यासाठी वाढली आहे, कारण त्यांच्यावर ‘शिवसेना’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या ब्रँडचे लेबल लागले आहे.”











