Telegram Reliance Dispute: भारतात नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणामुळे आधीच वादात सापडलेल्या टेलिग्राम अॅपच्या मालकाने आता थेट भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओवर गंभीर आरोप केले आहेत. टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत खळबळजनक दावा केला आहे.
रिलायन्स कंपनी भारताबाहेरील इतर देशांमधील टेलिग्रामची इंटरनेट कनेक्टिव्हिटी जाणूनबुजून विस्कळीत करत असल्याचे डुरोव्ह यांनी म्हटले आहे. रिलायन्सच्या या कृत्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईसह अनेक देशांतील कोट्यवधी युजर्सना टेलिग्राम वापरताना अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमका काय आहे ‘बीजीपी हायजॅकिंग’चा आरोप?
पावेल डुरोव्ह यांनी रिलायन्सवर एका तांत्रिक पद्धतीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे:
- नेटवर्क मार्गात हस्तक्षेप: रिलायन्स कंपनी टेलिग्रामचे नेटवर्क मार्ग ब्लॉक करण्यासाठी प्रगत इंटरनेट राउटिंग सिस्टममध्ये फेरबदल करत आहे, ज्याला तांत्रिक भाषेत बीजीपी हायजॅकिंग म्हटले जाते.
- जाणूनबुजून दुर्लक्ष: हा बिघाड तांत्रिक नसून जाणूनबुजून केला गेला आहे. या समस्येबाबत टेलिग्रामने रिलायन्सला अनेकदा रिपोर्ट पाठवले, पण रिलायन्सने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप डुरोव्ह यांनी केला.
- व्हॉट्सअॅपकडून स्पर्धा: मस्क यांच्याप्रमाणेच डुरोव्ह यांनीही यामागे व्यावसायिक युद्धाचा संशय व्यक्त केला आहे. रिलायन्समध्ये ‘मेटा’ कंपनीची भागीदारी आहे, जी व्हॉट्सअॅपची मालक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपला फायदा मिळवून देण्यासाठीच रिलायन्स टेलिग्रामचा गेम करत असल्याचा थेट दावा त्यांनी केला आहे.
भारतात टेलिग्रामवर आधीच आहे बंदीचे संकट
हा वाद अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा भारतात 21 जून रोजी होणाऱ्या नीट (NEET 2026) पुनरपरीक्षेच्या सुरक्षेसाठी सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. परीक्षा मंडळाच्या माहितीनुसार, जुन्या पेपर लीक प्रकरणात टेलिग्राम ग्रुप्सचा वापर झाला होता. त्यामुळे यंदा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या बंदीवरही पावेल डुरोव्ह यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पेपर लीक करणाऱ्या मुख्य गुन्हेगारांना पकडण्याऐवजी सरकारने टेलिग्रामवर बंदी घातल्यामुळे भारतातील 15 कोटींहून अधिक सामान्य युजर्सना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगभरातील कंपन्यांना केले आवाहन
रिलायन्सने अद्याप पावेल डुरोव्ह यांच्या या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, डुरोव्ह यांनी जगभरातील इतर इंटरनेट नेटवर्क ऑपरेटर कंपन्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी रिलायन्सकडून येणारे अनधिकृत नेटवर्क सिग्नल फेटाळून लावावेत, जेणेकरून इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरक्षित राहील.
हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग









