Solapur ZP Election : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अक्कलकोट, मोहोळ, सोलापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघात सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, रतिकांत पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी पत्नी, मुले व भावंडांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व पुन्हा दिसून आले आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची पत्नी वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांना यशवंतनगर पंचायत समितीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पत्नी संस्कृती राम सातपुते यांना दहिवडी जिल्हा परिषद गटातून मैदानात उतरवले आहे.
शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन उत्तम जानकर, तर माढा तालुक्यातील मातब्बर नेते शिवाजीराव सावंत यांनी मुलगा पृथ्वीराज सावंत यांना मानेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. अक्कलकोट तालुक्यात शिवसेना व भाजप आमने-सामने असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाऊ सागर कल्याणशेट्टी व वहिनी पूजा सागर कल्याणशेट्टी चपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल म्हेत्रे तोळनूर पंचायत समिती गणातून, तर पुत्र शिवराज म्हेत्रे सलगर जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहेत. घराणेशाहीला पुन्हा एकदा संधी दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.









