Tigress Attack : चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकाच वेळी चार व्यक्तींचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच आणि दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, गुंजेवाही गावातील भट्टी मोहल्ला (वॉर्ड क्रमांक १) येथील १३ महिलांचा एक गट आज पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेला होता. गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक परिसरातील घनदाट जंगलात या महिला काम करत असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, चार महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सोबत असलेल्या इतर महिलांची पाचावर धारण बसली.
मृतांची नावे:
वनविभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) कविता दादाजी मोहुर्ले (४५ वर्षे)
२) अनिता दादाजी मोहुर्ले (४६ वर्षे)
३) संगीता संतोष चौधरी (४० वर्षे)
४) सुनीता कौशिक मोहुर्ले (३५ वर्षे)
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे.
परिसरात तणावाचे वातावरण
एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने गुंजेवाही परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे. मानव-वन्यजीव संघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
भंडाऱ्यातही वाघाचा वावर; दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशत
भंडारा: चंद्रपूरमधील घटनेने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, शेजारील भंडारा जिल्ह्यातही वाघाचा थरार पाहायला मिळत आहे. जवाहरनगर येथील आयुध निर्माणी (Ordnance Factory) परिसरात एका वाघाचे दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने कामगार आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाण्याच्या शोधात वाघ मानवी वस्तीकडे?
विदर्भात सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. याच उष्णतेपासून सुटका करून घेण्यासाठी हा वाघ एका छोट्या पाण्याच्या स्रोताजवळ विसावा घेताना दिसून आला. तेथून जाणाऱ्या एका सजग नागरिकाने या दृश्याचे चित्रीकरण केले असून, हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे.
गस्त वाढवण्याची मागणी-
जवाहरनगर ते पेवठा मार्ग आणि डीएससी पलटण टी-पॉईंट या वर्दळीच्या रस्त्यांवरही अनेक वाहनधारकांना या वाघाचे दर्शन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी हा वाघ मध्यरात्री दिसला होता, मात्र आता तो दिवसाही मुक्तपणे वावरताना दिसत असल्याने धोका वाढला आहे.










