Uddhav Thackeray : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपूर येथे आयोजित भव्य ‘रामरक्षा आंदोलना’दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंका घेत, “त्यांना रामरक्षा तरी येते का?” असा जाहीर सवाल उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच आव्हानाला आणि टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरच्या भूमीवरून अत्यंत धारदार शब्दांत चोख उत्तर दिले आहे.
या आंदोलनादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आज नागपुरात सामूहिक रामरक्षा पठण करून आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला.
“मनात भाव नाही आणि रामरक्षा म्हणतायत!” – मुख्यमंत्री फडणवीसांना सडेतोड उत्तर
व्यासपीठावरून जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “अयोध्येत भव्य मंदिर उभं राहिलंय, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. परंतु, अत्यंत वाईट या गोष्टीचे वाटते की, आज त्या पवित्र मंदिराच्या रक्षणासाठी आणि तिथे झालेल्या लुटीविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरून लढा सुरू करावा लागत आहे. या आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या आणि आशीर्वाद देणाऱ्या मंदिराच्या विश्वस्तांचे (ट्रस्टी) मी आभार मानतो.”
भाषणादरम्यान त्यांनी संजय राऊत यांच्याशी झालेल्या संवादाचा किस्सा सांगत फडणवीसांना टोला लगावला. ठाकरे म्हणाले, “सकाळी मला संजय राऊतांचा फोन आला होता. त्यांनी विचारले, ‘उद्धवजी, भाषणासाठी टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का?’ मी विचारलं का? तर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला रामरक्षा बोलून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आज मी मुख्यमंत्र्यांच्या हक्काच्या शहरात, त्यांच्या गावातच त्यांना सांगू इच्छितो की – फडणवीसजी, रामरक्षा केवळ तोंडपाठ म्हणून दाखवणे हे तुमचे काम असू शकते, पण प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे आणि त्यांच्या मंदिराचे रक्षण करणे (रामरक्षा करणे) हे आमचे काम आहे! आम्ही खरे ‘रामरक्षक’ आहोत. ज्यांच्या मनात देवाविषयी कोणताही खरा भाव नाही, ते केवळ दाखवण्यासाठी रामरक्षा म्हणत आहेत. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ अशीच सध्या तुमची अवस्था झाली आहे.”
“भाजपच्या अंगात सैतान घुसलाय का?” – सोनम वांगचूक यांच्या अटकेवरून तीव्र संताप
आपल्या भाषणाचा ओघ पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या घडामोडींवर आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेवर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर बोट ठेवत ते म्हणाले, “दिल्लीत गेल्या २० दिवसांपासून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सोनम वांगचूक हे शांततापूर्ण मार्गाने अन्नत्याग उपोषणाला बसले होते. मात्र, काल मध्यरात्री प्रशासनाने त्यांची अत्यंत निर्दयीपणे उचलबांगडी केली. एखाद्या आंतरराष्ट्रीय अतिरेक्याला पकडण्यासाठी पोलीस जावे, तसे पोलीस तिथे घुसले. त्यांच्याभोवती चादरीचे पडदे लावले आणि त्यांना बळजबरीने रुग्णालयात डांबले. त्यांच्या समर्थनार्थ बसलेल्या अभिजित दीपके या तरुणाच्या अंगावर शाई फेकण्यात आली.”
या दडपशाहीवरून भाजपवर घणाघाती आरोप करताना ठाकरे पुढे म्हणाले, “मी मनोमन प्रभू श्रीरामाला प्रश्न विचारला की, हे देशात काय चालले आहे? ज्या भाजप सरकारने संपूर्ण देशात तुझ्या नावाने मते मागितली, सत्ता उपभोगली, आज त्याच भाजपच्या अंगात अचानक कोणता सैतान घुसला आहे? या लोकांच्या मनातील माणुसकी आता पूर्णपणे नष्ट झाली आहे.










