Home / महाराष्ट्र / Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेचा ‘विस्तार’, ठाणे-पुणे जोरात! १७ नव्या आमदारांची एन्ट्री; वाचा A टू Z माहिती.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेचा ‘विस्तार’, ठाणे-पुणे जोरात! १७ नव्या आमदारांची एन्ट्री; वाचा A टू Z माहिती.

Vidhan Parishad Election 2026 : आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. गेल्या...

By: Team Navakal
Vidhan Parishad Election 2026
Social + WhatsApp CTA

Vidhan Parishad Election 2026 : आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपूनही या जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांनंतर आता ७५ टक्के मतदारांची संख्या पूर्ण झाल्याने निवडणूक आयोगाकडून या जागांसाठी लवकरच बिगुल वाजवले जाण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १७ मतदारसंघांचा आढावा-
विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यसंख्येमध्ये २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून दिले जातात. यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर (अहमदनगर), ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांच्या निवडीमुळे विधान परिषदेचे संख्याबळ पूर्ण होण्यास मदत होणार असून, पावसाळी अधिवेशनापूर्वी सभागृहाचे चित्र स्पष्ट होईल.

१० जागांची निवडणूक बिनविरोध: राजकीय समीकरणे स्पष्ट-
दरम्यान, विधान परिषदेच्या अन्य १० जागांसाठी (९ नियमित आणि १ पोटनिवडणूक) होणारी प्रक्रिया अत्यंत नाट्यमयरीत्या बिनविरोध पार पडली आहे. १२ मे २०२६ रोजी या जागांसाठी मतदान होणार होते; मात्र १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांचेच अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. या राजकीय तडजोडीत सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व दिसून आले असून, विरोधी महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

विजयी उमेदवारांची पक्षनिहाय यादी-
भारतीय जनता पक्ष (०६ जागा): सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव या सहा उमेदवारांनी विजयावर मोहोर उमटवली.

शिवसेना – शिंदे गट (०२ जागा): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विजय मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (०१ जागा): झिशान सिद्दीकी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०१ जागा): महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे यांनी विजय संपादन केला आहे.

या निकालांमुळे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल बदलले असून, आता सर्वांचे लक्ष आगामी १७ जागांच्या निवडणुकीकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या जागांवर ताबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या