Mohit Suri New Movie : बॉलिवूडमधील ‘सैयारा’ या सुपरहिट चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील लोकप्रिय जोडी अहान पांडे आणि अनीत पड्डा पुन्हा एकदा दिग्दर्शक मोहित सुरी यांच्यासोबत नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. यशराज फिल्म्सच्या (YRF) बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे.
‘सैयारा’चे मोठे यश आणि पुनरागमन
अहान आणि अनीत यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत जागतिक स्तरावर धुमाकूळ घातला होता. एका उदयोन्मुख संगीतकार आणि अल्झायमरने ग्रस्त असलेल्या गीतकाराची ही भावस्पर्शी कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता हीच टीम पुन्हा एकदा एका अविस्मरणीय संगीतमय प्रेमकथेसाठी सज्ज झाली असून, अक्षय विधानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या भावना
‘आशिकी 2’, ‘एक व्हिलन’ आणि ‘मलंग’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मोहित सुरी या नव्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साही आहेत. ते म्हणाले की, “माझ्यासाठी प्रेम कथा नेहमीच खास राहिल्या आहेत. ‘सैयारा’च्या टीमसोबत पुन्हा काम करणे म्हणजे घरी परतल्यासारखे वाटत आहे. यावेळी मी एका नवोदित दिग्दर्शकासारखा अनुभव घेत असून, या चित्रपटातील संगीत पुन्हा एकदा लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल, अशी मला आशा आहे.”
2027 मध्ये होणार प्रदर्शित
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी अहान आणि अनीत या जोडीचे कौतुक करताना म्हटले की, ही आजच्या पिढीतील सर्वात आवडती जोडी आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार असून, 2027 मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी, मोहित सुरींच्या इतर चित्रपटांप्रमाणे यातही संगीताची मोठी मेजवानी असेल, हे नक्की.
हे देखील वाचा –











