नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय चर्चांना सध्या उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाचे खापर अजित पवार यांच्या गटावर फोडले जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 4 दिवसांत दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अजित पवार मंगळवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. बुधवारी पहाटे त्यांची अमित शहा यांच्याशी तासभर भेट झाली. या बैठकीचा तपशील अजून बाहेर आला नाही. याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत 80-90 जागांची मागणी केली जात आहे. तसेच महायुतीत अजित पवारांना का घेतले यावरून संघाकडून होत असलेली टीका थांबवण्याची मागणी अजित पवारांनी केली असावी, असे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर अजित पवार सकाळी 8 वाजता
महाराष्ट्रात परतले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जात तासभर चर्चा केली. या भेटीचा तपशीलही कळलेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसदेखील 27 जुलैला दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.