ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार! श्रीकांत शिंदेंचे पहिले पथक रवाना

नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी पहिले शिष्टमंडळ आज संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ अरब अमीरातसह काँगो, सीएरा लिओन आणि लायबेरिया या चार देशांना भेट देणार आहे. त्याचबरोबर संजय झा यांचे दुसरे पथक आज जपानला रवाना झाले. ते जपान व मलेशियात माहिती देणार आहेत.
श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळत सुषमा स्वराज यांची कन्या भाजपा खासदार बन्सुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा, एस. एस. अहलुवालिया, बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे (आययूएमएल) खासदार ई टी महंमद बशीर आणि भारतीय राजदूत सुजान चिनॉय यांचा समावेश आहे. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अपराजिता सारंगी, युसूफ पठाण, ब्रिजलाल, जॉन ब्रिटास, प्रदान बरूआ, हेमांग जोशी, सलमान खुर्शिद, मोहनकुमार यांचा समावेश आहे. उद्या कनिमोळी करूणाकरन यांच्या नेतृत्वाखालील पथक स्पेनला रवाना होईल.
केंद्र सरकारची 7 शिष्टमंडळे येत्या चार दिवसांत विविध देशांच्या दौऱ्यांवर जाणार आहेत. त्या-त्या देशातील महत्त्वाचे नेते, सरकारी प्रतिनिधींशी ही शिष्टमंडळे चर्चा करतील. त्याचबरोबर काही निवडक ठिकाणी सर्वसामान्य जनतेशीदेखील संवाद साधतील. या 7 शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदारांसह विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. शिष्टमंडळांचे नेतृत्व कोणी करायचे आणि प्रत्येक शिष्टमंडळाने कोणकोणत्या देशांचे दौरे करायचे हे सरकारने निश्चित केले आहे. या शिष्टमंडळांमध्ये एकूण 51 सदस्य आहेत. त्यापैकी 31 प्रतिनिधी हे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आहेत. तर उर्वरित 20 सदस्य हे विरोधी पक्षांमधील आहेत.
नेमके काय सांगणार?
पाकिस्तान गेल्या काही दशकांपासून दहशतवादाला कसा खतपाणी घालत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ सारख्या मोहिमांद्वारे त्याला कसे तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे, हे जगापुढे मांडण्यासाठी शिष्टमंडळांतील सदस्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल सातपैकी तीन शिष्टमंडळांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्याची सूचना मिस्री यांनी शिष्टमंडळांना केली आहे. भारताची कारवाई थांबवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी विनंती पाकिस्ताननेच केली होती, हेही ठासून सांगण्याच्या सूचना शिष्टमंडळाला देण्यात आल्या आहेत.
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र कोणी आमच्यावर हल्ला केल्यास जशास तसे उत्तर देऊ. भारताचा मुख्य भर आर्थिक विकासावरच राहिला आहे. याउलट पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे, असा स्पष्ट संदेश आम्ही देणार आहोत.

Share:

More Posts