डेहराडून – उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे व दरडी कोसळ्याने केदारनाथचा रस्ता बंद झाल्याने महाराष्ट्रातील १२० यात्रेकरू येथे अडकले आहेत. इतर राज्यांतीलही एकूण १२०० ते १५०० यात्रेकरू या भागात अडकले असून त्यातील १६ जणांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरुप डेहराडून येथे आणण्यात आले.
या भाविकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र शासन उत्तराखंड सरकारच्या संपर्कात आहे. उत्तराखंड सरकार मात्र या यात्रेकरुंच्या संदर्भात योग्य ती माहिती देत नसून अडकलेल्या यात्रेकरुंना योग्य ती मदत करत नसल्याचा आरोप येथे अडकलेल्या पर्यटकांनी केला आहे. या यात्रेकरुंमध्ये रायगड जिल्ह्यातील ८० भाविकांचाही समावेश आहे. गौरीकुंड ते सोनप्रयागपर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे हे यात्रेकरू अडकून पडले असून त्यांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. त्यांच्याकडील पैसेही संपल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या त्यांची सर्व भिस्त ही हेलिकॉप्टरद्वारे होणाऱ्या सुटकेवर असून खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावरही मर्यादा आलेल्या आहेत.