निवासी भागात फटाके विक्री नको! उच्च न्यायालयात याचिका दाखल

ठाणे- कोपरी परिसरातील निवासी भागात काहीजणांनी फटाक्यांची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत.अशा फटाके विक्रीला कोपरी बचाव समितीने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या फटाके विक्रेत्यांचे मोकळ्या मैदानात स्थलांतर करावे, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

वास्तविक, फटाके विक्री निवासी भागात न करता खुल्या मैदानात करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.तरीही न्यायालयाचे हे निर्देश डावलून कोपरीतील काही निवासी भागात दुकानदारांनी फटाक्याची मोठीमोठी दुकाने थाटली आहेत.यासंदर्भात कोपरी बचाव समितीने ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने आता समितीच्यावतीने हरेश सारवान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामध्ये ठाणे पालिकेला प्रतिवादी केले आहे.दरम्यान,फटाके व्यावसायिकांचे म्हणणे आहे की,ज्यांच्याकडे केंद्र शासनाचा कायमस्वरूपी परवाना आहे,ते जागेवरच व्यवसाय करू शकतात. या परवान्याचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण होत असते.ही कायदेशीर प्रक्रिया असून हा नियम देशभरात आहे.मात्र नवीन लोकांना तात्पुरत्या स्वरुपात पालिका खुले मैदान उपलब्ध करून देत असते.