नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर पाकिस्तानवर केलेला हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक आहे. या हल्ल्यात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय संसदेवर हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानचा सर्वात क्रूर दहशतवादी मौलाना मसूर याचे 10 जणांचे कुटुंब या हल्ल्यात ठार झाले. पहलगाम हल्ल्यात निरपराधांना ठार करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केलेल्या या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे अत्यंत चपखल नाव दिले होते.
भारताने हल्ला केल्यानंतर लष्कराने पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची माहिती दिली . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत ही कारवाई लवकर संपावी अशी प्रार्थना केली.
भारताने हल्ला केला त्या भागात काही तळ पाकिस्तानच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर आत होते. कुठल्याही लष्करी ठिकाणावर हल्ले करण्यात आले नाहीत. एकही नागरिक ठार झाला नाही, असे भारताने म्हटले आहे. या हल्ल्यानंतर देशभर आनंद व्यक्त होत असून भारतीय लष्कराचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याचे भारताने व्हिडिओ पुरावेही दिले आहेत.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर निर्घृण हल्ला करून 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिक अशा 26 जणांची हत्या केली होती. या हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याने भारत याचे प्रत्युत्तर कधी देणार याची सर्वच वाट पाहत होते . पंतप्रधान मोदी हे गेले काही दिवस सतत लष्कर प्रमुख आणि इतर खात्याचे मंत्री यांच्यासोबत बैठका घेत होते. त्यांनी पाकिस्तानवरील प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी लष्कराला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याची पूर्ण मुभाही दिली होती. त्यानंतर हल्ल्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भारताच्या कारवाईनंतर युद्धजन्य परिस्थिती उद्भवलीच तर भारतीय नागरिकांनी तयार असावे, यासाठी भारतातील अनेक शहरात आज मॉक ड्रिल जाहीर केले होते. हे मॉक ड्रिल झाल्यानंतर भारताकडून कारवाई होईल, अशा भ्रमात पाकिस्तान असतानाच भारताने मध्यरात्रीच पाकिस्तानवर हल्ला चढवला.
लष्कराने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री 1.05 वाजता हल्ला सुरू झाला. तो 1.30 वाजता संपला. या 25 मिनिटांत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले. हे तळ दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान आणि प्रशिक्षण केंद्र होते. या तळांवरुनच दहशतवादी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात पाठवले जात होते. भारताने याच तळांवर क्षेपणास्त्र डागून त्यांना बेचिराख केले. यात सवाई नाला कॅम्प (मुझफ्फराबाद), सय्यद ना बिलाल कॅम्प (मुझफ्फराबाद), गुलफूर कॅम्प (कोटली),बरनाला कॅम्प (भिमबर), अब्बास कॅम्प (कोटली) या पाकव्याप्त काश्मीरमधील, तर सरजल कॅम्प (सियालकोट), मेहमुना जोया कॅम्प (सियालकोट), मरकझ तोयबा (मुरीदके), मरकझ सुभानअल्लाह (बहावलपूर) या पाकिस्तानातील ठिकाणांचा समावेश होता. लष्करे तोयबा, जैश ए मोहंमद, हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांची ही ठिकाणे होती. हल्ला झाला त्यावेळी या ठिकाणी अनेक दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात अंदाजे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. यात 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट रचणारा कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझरच्या कुटुंबातील सर्व 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात हे सगळे मारले गेले. मसूदची मोठी मुलगी, तिचे पती व मुले यांचा समावेश आहे. मसूदचा भाऊ रउफ गंभीर जखमी झाला आहे. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मसूदने, या हल्ल्यात मीही ठार झालो असतो तर बरे झाले असते, असे म्हटल्याची माहिती आहे. याशिवाय मुदस्सीर आणि हाफीज अब्दुल मलिक हे लष्कर ए तोयबाचे कमांडर मुदरिके येथील हल्ल्यात ठार झाले आहेत. याकुब मुगल, खलिद मोहंमद हेही वेगवेगळ्या ठिकाणच्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी मृत दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या. भारतीय क्षेपणास्त्रांनी 100 किलोमीटर आत घुसून हल्ला केला तेव्हा पाकिस्तानची रडार सिस्टम आणि गुप्तचर खाते झोपले होते का,असा सवाल संतप्त झालेले पाकिस्तानी नागरिक विचारत आहेत.पाकिस्तानकडून निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की 6 ठिकाणी 24 क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला असून 33 लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आली. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारताचा हा हल्ला युद्धाची कृती आहे. पाकिस्तानला त्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
भारत लष्कराने सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. लष्कराच्या प्रवक्त्यांऐवजी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेतली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले की, पहलगाम हा एक भ्याड हल्ला होता, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारले गेले. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. गेल्या वर्षी सव्वा दोन कोटींहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये आले होते. काश्मीरचा विकास आणि प्रगतीला हानी पोहोचवून काश्मीरला मागास ठेवणे, देशात जातीय दंगली पेटवणे असा या हल्ल्याचा उद्देश होता. टीआरएफ नावाच्या एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तिच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. ती लष्कर-ए -तोयबाशी संबंधित आहे. त्यातून या हल्ल्याचा कट हा भारतात सीमापार दहशतवाद पसरवण्याच्या पाकिस्तानच्या योजनेचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. या दहशतवाद्यांना रोखण्याचा आमचा अधिकार आम्ही बजावला आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणे निवडून ती नष्ट केली. येथे लाँचपॅड आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.
विश्वसनीय आणि गुप्तचर माहितीच्या आधारे ही लक्ष्य निवडण्यात आली. या कारवाई दरम्यान निष्पाप लोक आणि नागरी पायाभूत सुविधांना इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आम्ही दहशतवादी लपण्याच्या, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या ठिकाणांनाच अचूक लक्ष्य केले.
हा हल्ला झाल्यावर बिथरलेल्या पाकिस्तानने काल रात्रीही आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि 30 जखमी झाले. भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर दिले. भारताच्या हल्ल्यानंतर भारतीय विमान कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात जल्लोष
भारतीय लष्कराच्या ’ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर देशभरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या यशस्वी कारवाईनंतर देशातील अनेक राज्यांत नागरिकांनी जल्लोष साजरा केला. उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाराष्ट्रातील सांगली, डोंबिवली, पालघर, भिवंडी, बुलढाणा, पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला, नागपूर, खामगाव, पंढरपूर, खेड व उमरगा या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येत भारत माता की जय आणि भारत जिंदाबाद च्या घोषणा देऊन लष्कराच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले.
भारत – पाक तणाव संपेल! ट्रम्प यांना आशा
भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत – पाक या दोन्ही देशातील तणाव संपण्याची आशा व्यक्त केली. माध्यमांनी एका कार्यक्रमात त्यांना भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत विचारले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटते की भूतकाळातील घटनांमुळे अनेक लोकांना काही तरी घडणार याबद्दल अंदाज होता. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.दोन्ही देशातील वाढलेला तणाव लवकरच संपेल अशी आशा आहे.
ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांचे बारीक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून होते. हे ऑपरेशन सुरू असताना 7 कल्याण नगर मार्ग येथील निवासस्थानी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभालही त्यांच्यासोबत होते. अजित डोभाल यांनी सर्व मोहिमेची इत्यंभूत माहिती पंतप्रधानांना दिली. ही कारवाई चालू असताना रात्री 1.05 मिनिटांपासून ते दीड वाजेपर्यंत प्रत्येक हल्ला, त्याची ठिकाणे, त्या ठिकाणाचे महत्त्व, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले क्षेपणास्त्र यांची माहिती डोभाल यांनी पंतप्रधानांना दिली. काल सकाळीही दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे बंद दाराआड बैठक झाली होती.
दिल्लीत उद्या सर्वपक्षीय बैठक
केंद्र सरकारकडून उद्या सकाळी 11 वाजता संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांना आजच्या एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर बाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर सरकारची पुढील रणनीती काय असेल, हेदेखील स्पष्ट करण्यात येईल. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे खासदार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत, अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह देशातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधींनी भारतीय सैन्याचे कौतुक केले
भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईवर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. त्यांनी एक्सवर लिहले की, आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे.
भारताच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली 9 ठिकाणे
सवाई नाला कँप (बहावलपूर) – दहशतवाद्यांचा हा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 30 किलोमीटर दूर आहे. लष्कर ए तोयबाचे हे प्रमुख प्रशिक्षण तळ होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेला सोनमर्ग येथील हल्ला, 24 ऑक्टोबर रोजी गुलमर्ग येथे झालेला हल्ला व 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्लयातील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण याच ठिकाणी करण्यात आले होते.
सयदना बिलाल कँप (मुज्जफराबाद)- हा तळ जैश ए मोहम्मदचा असून या ठिकाणी दहशतवाद्यांना ठेवण्यात येत होते. तिथे त्यांना हत्यारे, विस्फोटके आणि जंगलात कसे राहायचे याचे प्रशिक्षण दिले जात होते.
गुलपूर कँप (कोटली) – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 30 किलोमीटर दूर असलेला हा दहशतवाद्यांचा तळही भारताने उद्ध्वस्त केला. लष्कर ए तोयबाचा तो बेसकँप होता. राजोरी व पुंछ भागात सक्रिय असलेले दहशतवादी इथे राहात होते. 20 एप्रिल 2023 रोजी पुंछ इथे झालेला हल्ला व 9 जून 2024 रोजी यात्रेकरुंच्या बसवरील हल्ला इथूनचा नियंत्रित करण्यात आला. त्यातील दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आले होते.
बर्नाला कँप (बिंबर) – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 9 किलोमीटर दूर असलेल्या दहशतवादी तळावर हत्यारे चालवणे, त्यांची हाताळणी करणे त्याचप्रमाणे ओळखपत्रांसंदर्भात कागदपत्रांची जुळवाजुळव जंगलात राहण्याचे प्रशिक्षण या तळावरुन दिले जात होते.
अब्बास कँप (कोटली) – दहशतवाद्यांचा हा तळ नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर दूर होता. लष्कर ए तोयबाचे फिदाईन इथे तयार होत होते. एकाच वेळेस 15 दहशतवाद्यांना आश्रय व प्रशिक्षण देण्याचे काम या तळावरुन केले जात होते.
सर्जल कँप (सियालकोट) – हा प्रशिक्षण तळ पाकिस्तानमधील आहे. ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर दूर होते. मार्च 2025 मध्ये जम्मूमध्ये 4 पोलिसांची हत्या झाली होती. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आले होते.
महमुना जोया कँप (सियालकोट) – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12 ते 18 किलोमीटर दूर असलेला हा दहशतवाद्यांचा मोठा तळ होता. कठुआ, जम्मू क्षेत्रात दहशत माजवण्याचे हे एक केंद्र होते. पठाणकोट येथील वायुदलाच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्याचा कटही इथेच शिजवण्यात आला व तो कशाप्रकारे करायला हवा याची योजनाही इथेच तयार करण्यात आली.
मरकत ताईबा (मुरिदके) – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 18 ते 25 किलोमीटर दूर असलेला हा दहशतवादी तळ 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे मुख्य केंद्र होते. इथेच अजमल कसाब व डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
मरकज सुब्बानअल्ला (बहावलपूर) – पाकिस्तानच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर दूर असलेला हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांची भरती करून घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची कागदपत्रे तयार करणे आदी महत्त्वाची कामे चालत असते. अनेक मोठे दहशतवादी या ठिकाणी वर्दळ असते. 2001 सालचा संसदेवरील हल्ला व पुलवामा हल्ल्याचा कटही याच ठिकाणी आखण्यात आला होता. येथील मरकज येथे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, मुफ्ती अब्दुल रौफ असगर, मौलाना अम्मार यांची घरे आहेत.