राणा हे आमदार नव्हे, तर सावकार! तुषार भारतीयांचा हल्लाबोल

अमरावती : रवी राणा आमदार नव्हे तर सावकार आहेत अशी टीका भाजपाचे नेते तुषार भारतीय यांनी केले आहे.अमरावती येथील बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणांच्या उमेदवारीला भाजपा पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला तुषार भारतीय यांनी संबोधित केले, यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला. तुषार भारतीय म्हणाले की, आमदार रवि राणा यांनी बडनेरा मतदारसंघात कोणतेही विकासकाम केलेले नाही. बडनेरा मतदारसंघातील अनेक गावात पक्के रस्ते नाहीत. राजुरा, चिरोडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील राणा सोडवू शकले नाहीत. अनेक गावांची अवस्था अतिशय वाईट आहे. असे असताना आमदार रवी राणा यांनी आपल्या अनेक स्वीय सहाय्यकांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून देण्याच्या नावाखाली पैसे खाल्ले आहेत. पैसे खाऊनदेखील अनेकांची कामे केलेली नाही.