PM Modi on Women’s Reservation: संसदेत महिला आरक्षण (१३१ वी घटनादुरुस्ती) विधेयक फेटाळले गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
“विरोधकांच्या स्वार्थी राजकारणामुळे महिलांच्या हक्कांची ‘भ्रूणहत्या’ झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ३० मिनिटांच्या या भाषणात पंतप्रधानांनी प्रामुख्याने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि द्रमुक (DMK) या पक्षांना लक्ष्य केले.
PM Modi on Women’s Reservation : देशातील महिलांची माफी आणि विरोधकांवर प्रहार
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे विधेयक मंजूर करून घेऊ न शकल्याबद्दल मी देशातील सर्व माता-भगिनींची माफी मागतो. काँग्रेस, द्रमुक, टीएमसी आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांच्या संकुचित राजकारणामुळे देशातील महिलांचे मोठे नुकसान झाले आहे.” विशेष म्हणजे, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील आठवड्यात निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या प्रादेशिक पक्षांवर थेट निशाणा साधला आहे.
PM Modi on Women’s Reservation :“महिला अपमान विसरत नाहीत”
शुक्रवारी लोकसभेत हे विधेयक बहुमताअभावी फेटाळले गेले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिला मोठा वैधानिक पराभव मानला जात आहे. यावर बोलताना मोदी म्हणाले, “संसदेत जेव्हा हे विधेयक पडले, तेव्हा विरोधक बाके वाजवून आनंद साजरा करत होते. हे केवळ बाके वाजवणे नव्हते, तर महिलांच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर केलेला हल्ला होता. महिला इतर गोष्टी विसरतील, पण आपला अपमान कधीच विसरत नाहीत.”
PM Modi on Women’s Reservation : जागा वाढवण्याच्या प्रस्तावावर स्पष्टीकरण
विरोधकांनी या विधेयकाला विरोध करताना असा आरोप केला होता की, सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पंतप्रधानांनी हे आरोप फेटाळून लावले. “आम्ही प्रत्येक राज्यातील संसदेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याची तयारी दर्शवली होती, जेणेकरून प्रत्येक राज्याचा आवाज संसदेत अधिक प्रभावीपणे ऐकू येईल. पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या प्रामाणिक प्रयत्नांची हत्या केली,” असे मोदी म्हणाले.
लढा सुरूच राहणार
भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी आपला निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “काल आमच्याकडे लोकसभेत ६६ टक्के मते नव्हती, याचा अर्थ आम्ही हरलो असा होत नाही. आमचा संघर्ष इथेच थांबणार नाही. महिला शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
विरोधकांच्या या भूमिकेला देशातील महिला येणाऱ्या काळात चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.










