अडीच वर्षीय मुलीवर बलात्कार! बुलडाण्यात १७ वर्षीय मुलाला अटक

बुलडाणा- बुलडाण्याच्या नांदूरा तालुक्यात अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली. त्याने मुलीचे डोके दगडाने ठेचून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. मुलीची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. त्याने मुलीवर बलात्कार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
ही मुलगी गुरुवारी बेपत्ता झाल्याने आई-वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही लोकांनी मुलीला आरोपी मुलासोबत पाहिले होते. त्यानंतर नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता ही मुलगी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत सापडली. या मुलीच्या डोक्यावर मोठी जखम होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी मुलगा हा मुलीच्या घराच्या जवळच राहतो. चॉकलेटचे आमीष दाखवून मुलीला पळवले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी कबुली आरोपीने पोलीस चौकशीत दिली. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी या घटनेवर प्रतिक्रिया म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, ॲड. उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणाचा खटला लढावा, अशी माझी विनंती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top