Home / News / काँग्रेस आपली जादा मते कुणाला देणार? उबाठाला की पवारना? जयंत पाटील बळी जाणार?

काँग्रेस आपली जादा मते कुणाला देणार? उबाठाला की पवारना? जयंत पाटील बळी जाणार?

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोन उमेदवार निवडून आणण्याइतकेच आमदारांचे संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडे 37 मते असल्याने त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. परंतु काँग्रेसकडील अतिरिक्त 14 मते कुणाला मिळणार? यावर मविआच्या दुसर्‍या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. ही मते उबाठाचे उमेदवार नार्वेकरना मिळणार की शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांना मिळणार हा प्रश्न आहे. उध्दव ठाकरे हे नार्वेकरना निवडून आणणारच असे म्हटले जाते. मग जयंत पाटील यांचा बळी जाणार की तेल लावलेला पैलवान महायुतीची मते फोडून जयंत पाटीलनाही निवडून आणण्याचा चमत्कार करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभेपूर्वी होणारी ही शेवटची निवडणूक असल्याने दोन्ही आघाडीकडून आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी सगळ्याच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यासाठी आकडेमोड आणि समिकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार मैदानात आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदा खोत यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाने भावना गवळी, कृपाल तुमाणे यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे निवडणूक लढवत आहेत. डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष), मिलिंद नार्वेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे महायुतीचे उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नसल्यानेच त्यांनी स्वपक्षातील उमेदवार न देता जयंत पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांना बळीचा बकरा बनवला आहे, अशी चर्चा होत आहे. मात्र त्याच वेळी मविआचे सर्व उमेदवार निवडून येतील असाही दावा केला जात आहे . त्यामुळे अजित पवार गट किंवा शिंदे गटाची मते फोडून जयंत पाटील विजयी होतात का यावर लक्ष आहे. आपले आमदार फुटू नये म्हणूनच महायुतीच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात बंदिस्त ठेवले आहे.
महायुतीमध्ये भाजपाकडे 103, शिवसेनेकडे 40, आणि राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष 1 यांचा महायुतीला पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ 203 इतके आहे. तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष (1) असे 69 आमदार आहेत.
या निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसर्‍या आणि गरज पडली तर तिसर्‍या पसंतीची मते मोजली जातील. संख्याबळानुसार भाजपाचे पाचही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येण्यास अडचण नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसकडे 14 अतिरिक्त मते असल्याने काँग्रेसचा एका उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी एक जण पराभूत होणार हे निश्चित असले तरी फोडाफोडी होऊन चमत्कार घडू शकतो . काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांवर उबाठा गटाचा आणि शेकापच्या जयंत पाटील यांचा डोळा आहे. मात्र काँग्रेसचे काही आमदार भाजपालाही मतदान करण्याची शक्यता आहे. काँग्रेसची मते कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला जातील हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचे गणित अवघड आहे असे महायुतीचे नेते सांगतात . मविआ मात्र सर्व उमेदवार निवडून आणणार असा दावा करीत आहे .
शिंदे गटाचे आमदार आशीष जैस्वाल म्हणाले की, उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांचा पराभव होऊ देणार नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांना आवश्यक तेवढी मते मिळणार नाहीत. तर शिवसेना शिंदे गटाचे आणखी एक आमदार महेंद्र दळवी यांनीही शेकापचे जयंत पाटील पराभूत होणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, आमचा विजय निश्चित होणार आहे. पण त्यांचा मात्र एकच आमदार निवडून येईल. शेकापचे जयंत पाटील यांची विकेट जाऊ शकते.
अजित पवार गटाचे आमदार आनंद परांजपे यांनीही अशीच प्रतिक्रिया देत म्हटले की, राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होतील. पण महविकासआघाडीच्या तीनपैकी एकाचा पराभव निश्चित होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी होऊ शकतात. त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.