कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत, यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती, डोंबिवलीतील काही प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
डोंबिवली पूर्वेतील फ, ग आणि पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांत गळती सुरू आहे. काही ठिकाणी व्हाॅल्व्हमध्ये बिघाड असल्याने त्या ठिकाणाहून पाण्याचे कारंजे उडत आहेत. यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी गळतीविषयी नागरिकांनी पालिकेतील तक्रारी केल्या होत्या. गेल्या दोन महिन्यापासून कल्याण-डोंबिवली पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात होता. त्यामुळे पाणी गळतीची दुरूस्तीची कामे करणे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते. आता निवडणुका संपल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ही दुरुस्तीची कामे हाती घेतली.









