Home / News / बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोदा- बडोदा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल शुद्धीकरण केंद्राच्या तेल साठवणूक टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीवर आज सकाळी नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आयओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात साठवून ठेवण्यात आलेल्या बेंझिनच्या टाकीत स्फोट झाला. ही आग शेजारच्या इतर दोन टाक्यांपर्यंत पसरल्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. आज सकाळी ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या दुर्घटनेत आयओसीएलचा एक अधिकारीही जखमी झाला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याचे लक्षात आल्याबरोबर कंपनीतील पाण्याच्या फवाऱ्यांची प्रणाली सुरु झाली. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रिफायनरी मधून उठलेले धुरांचे लोट दूरदूरपर्यंत दिसून येत होते.