बीडीडी सह मुंबईच्या अनेक भागात मतदान बहिष्काराचा इशारा…

मुंबई- मुंबई आणि लगतच्या कल्याण, ठाणे भागात लोकसभेसाठी येत्या 20 मे ला मतदान होत आहे, पण आता सरकार कोणाचेही येवो पण नागरिकांनीच आता मतदान हातात घेतले आहे. आपले महत्वाचे प्रश्न जर राजकीय पक्षांकडून सोडवले जात नसतील तर मतदान का करायचे हा या नागरिकांचा सवाल आहे.थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला आहे.
विविध नागरी समस्यांची सोडवणूक न झाल्यामुळे आणि प्रशासनाला या संदर्भात वारंवार तक्रार करूनही सोडवणूक होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हा पवित्रा घेतला असल्याचे सांगितले आहे.
बीडीडी वासीयांचा मतदानावर बहिष्कार
दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील नाम जोशी मार्ग येथील शेकडो मतदारांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. बीडी पुनर्विकास प्रकल्पात वरळी येथील पुनर्विकासातील सदनिकांना प्रत्येक घरामागे एक पार्किंग देण्यात येणार आहे. तसा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. मात्र हा निर्णय याच प्रकल्पातील नाम जोशी मार्ग आणि नायगाव प्रकल्पात लागू करण्यात आलेला नाही. एकाच पुनर्विकास प्रकल्पातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय देऊन सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे. आम्हालाही प्रत्येक घरामागे पार्किंग मिळालेच पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही, असे येथील नागरिक सुरेश मोरे यांनी सांगितले. तर सातत्याने आम्ही पाठपुरावा करूनही जर सरकारला जाग येत नसेल आणि जर सरकार आमच्यावर अन्याय करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकाला टाकावा लागेल, तसा निर्णय आम्ही नाम जोशी मार्ग बी डी डी पुनर्विकास समितीच्या वतीने घेत आहोत असे समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.
शिवाजी पार्क मैदानातील माती काढा
दरम्यान शिवाजी पार्क मैदानामध्ये लाल माती धुळीमुळे उडत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेला नोटीस बजावून ही माती पंधरा दिवसात काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र महापालिकेच्या वतीने अत्यंत संथ गतीने हे काम सुरू असून नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी मुले खेळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाल मातीची धूळ उडून प्रदूषणाचा त्रास लोकांना होत आहे या संदर्भात जर प्रदूषण मंडळाने पत्र पाठवूनही महापालिकेकडून कारवाई होत नसेल तर आम्ही आमच्या हक्कापासून वंचित राहणार असू तर कशासाठी मतदान करायचे असा सवाल उपस्थित करीत शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे नेते प्रकाश बेलवडे यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
हाच प्रश्न विले पार्ले येथे राहणाऱ्या नागरिकांचा आहे. अंधेरी येथील गोखले ब्रिज पडल्यापासून विले पार्ले (पूर्व) भागातील सर्वच रस्त्यावर हवेचं प्रचंड प्रदूषण झालं आहे. त्याचबरोबर पारला पूर्व येथील दुभाषी मैदानात धुळीचे प्रमाण कमालीचे वाढते आहे त्यामुळे मैदान चांगले असून ही इथे कायम मास्क लावून फिरावे लागते.येथे ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पार्लेकरांच्या ही तक्रारीची स्थानिक लोकसभा सदस्य निवडून आल्यावर दखल घेतील. अशी आशा आहे. असे प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् डॉ. राजेन्द्र बर्वे म्हणाले.
ठाण्यात ही घोडबंदर गावातील रस्ता एखाद्या जलतरण तलावा सारखा झाला आहे. रस्त्याला गटारगंगे चे स्वरूप आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. .ठाणे पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका वाघबीळ गावातील रहिवासी्याना बसत आहे. जवळजवळ 10 वर्षांपासून या रस्त्यावरून ड्रेनेज चे पाणी वाहत आहे, रस्त्यावरून ये जा करताना नागरिक हैराण होत आहेत. या संदर्भात पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या पण कोणीही लोकप्रतिनिधीनी किंवा पालिकेने काही पावले उचलली नाहीत त्या मुळे आता हे पाऊल आम्ही उचलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
. कल्याण, विठ्ठलवाडी स्टेशन समोर च कल्याण डोंबिवली पालिका बी ओ टी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत आहे, त्याचे काम एका खाजगी कंत्राटदाराला दिले आहे, त्याच्याकडून वालधुनी नदीपात्रात भराव टाकला जात आहे. त्या ठिकाणी भली मोठी भिंत बांधली जाणार आहे, त्या मुळे नदीपात्रा लागत असलेल्या नागरिकांना पावसाळ्यात पुराचा धोका आहे, त्यामुळे हे काम बंद करा नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top