मशीनमध्ये कचकच बटण दाबा, निधी देतो! नाहीतर हात आखडता घेईन! अजित पवारांची धमकी

इंदापूर- ष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे अनेकदा अत्यंत वादग्रस्त विधाने करतात आणि मग उपोषण करून माफी मागतात. सध्या त्यांचे सर्व लक्ष आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून विजयी करण्यावर आहे. त्यासाठी ते पुणे जिल्ह्यात सतत सभा घेतात. या सभांमध्ये ते मतदारांना अप्रत्यक्षपणे धमकावित म्हणतात की, मी निधी देतो, पण मशीनमध्ये माझ्यासाठी कचकच बटण दाबा, म्हणजे निधी द्यायला मला बरे वाटेल. नाहीतर मी हात आखडता घेईन.
अजित पवारांच्या या वक्तव्याने खळबळ माजली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, दादांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत, त्या नात्याने ते असे बोलतात, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र त्यांच्या वक्तव्यावर कठोर टीका करताना म्हटले की, अजित पवार स्वतः व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदा करणारच आहेत. आपला देशच एक व्यापारी चालवतो आहे, त्याने ठिकठिकाणी असे एजंट नेमले आहेत.
अजित पवार यांनी आज सकाळी इंदापुरात डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, राज्यात माझ्याकडे सहा लाख कोटी रुपयाचे बजेट आहे. त्यातून करमाळा ते इंदापूर उड्डाण पुलासाठी मी 382 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
तुम्हाला मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हवे आहे, महिलांसाठी रुग्णालय हवे आहे, या सर्वांचा एक प्रस्ताव तयार करा, आचारसंहिता संपली की लगेच बैठक घेऊन काम सुरू करू. मी द्यायला जातोय तेव्हा आता इकडे तिकडे जाऊ नका, इथेच राहा.
केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्यासाठी रुग्णालयाकरिता कोटयवधीचा निधी आहे. राज्य सरकार आणि केंद्राकडून मी निधी मिळवीन. बऱ्याच गोष्टी करता येतील. तुमच्याकडे रुग्ण येतो त्याने आमचे नाव घेतले तर चांगली वागणूक द्या, दुसऱ्याचे नांव घेतले तर टोचा. तुम्ही महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. त्याने पुणे जिल्ह्याला फायदा होईल. ही भावकी – गावकीची निवडणूक नाही. मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, मी वाढप्या म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. वाढप्या ओळखीचा असेल तर कितीही वाढून घेता येते. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top