‘महानंद’ कर्मचाऱ्यांना चार महिने वेतन नाही! सामूहिक उपोषणाचा इशारा

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे मुंबईच्या महानंद डेअरीतील कर्मचाऱ्यांना चार महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे महानंदमधील कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यवस्थापनाने यात गांभीर्याने हे वेतन कर्मचार्यांना द्यावे. नाहीतर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा महानंदमधील कर्मचारी संघटनेने दिला आहे.
महानंद डेरीची आर्थिक परिस्थिती गेली काही वर्षे खालावली आहे. हा विषय सरकारकडे अनेकदा उपस्थित झाला असून यासंदर्भात पत्रव्यवहारही झाला आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला स्वेच्छानिवृत्ती द्यावी. तसेच हा महासंघ राष्ट्रीय दूध विकास बोर्डाकडे द्यावा, अशी मागणी कर्मचार्यांनी केली आहे. यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसून गेले चार महिने कर्मचार्यांचे वेतनही थकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घर चालवणे अवघड होत आहे. कर्मचार्यांना आपल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरता येत नसल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. घरकर्जाचे हप्ते न भरल्याने बँकांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. वेतन थकीत असल्याने कर्मचारी तणावाखाली असून एका कर्मचार्याने आत्महत्याही केली आहे. तर अनेक कामगारांना अर्धांगवायू आणि मेंदूविकारासारखे आजार जडले आहेत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
ही बाब चिंताजनक असून संचालक मंडळाचे चुकीचे धोरण आणि निर्णयामुळे हे घडले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने यात गांभीर्याने लक्ष घालून १० डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या अडचणी न सोडवल्यास ११ डिसेंबर पासून प्रिया भारत मिटके या महानंद दुग्धशाळा येथे उपोषण करणार आहेत. त्यांचा पाठिंबा देण्यासाठी कर्मचारीही कुटुंबासह उपोषणास बसणार असल्याचा इशारा महानंदच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top