मुंबई हाफ मॅरेथॉन आज रंगणार यंदा महिलांचा विक्रमी प्रतिसाद

*सचिन तेंडुलकरच्या हस्ते
स्पर्धेची होणार सुरुवात

मुंबई- ‘रन टुडे, फिनिश फिअरलेस’ हे घोषवाक्य घेऊन एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन- २०२४ ही उद्या आयोजित करण्यात आली आहे.या धावण्याच्या स्पर्धेला एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा सकाळी ५ वाजता जिओ गार्डन,वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून झेंडा दाखवणार आहे.

या स्पर्धेमध्ये यंदा तब्बल ६२०० पेक्षा जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदविला आहे.या स्पर्धेतील १० किलोमीटरसाठी ८ हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत.या हाफ मॅरेथॉनमध्ये राज्यातील आणि इतर ठिकाणच्या काही मातब्बर खेळाडूंसह ४ हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच ५ किलोमीटरच्या शर्यतीत ५ हजार, तर तर ३ किलोमीटरच्या शर्यतीत ३ हजारहून हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मुंबई मॅरेथॉन होणार असून त्यासाठी आतापासूनच नावनोंदणी सुरू झाली आहे. मुंबई मॅरेथॉनचे हे १५ वे पर्व आहे.ही स्पर्धा १९ जानेवारी रोजी पार पडणार आहे.या स्पर्धेसाठी १३ डिसेंबर ही नाव नोंदविण्याची अंतिम तारीख आहे. जवळपास ६० हजारांपर्यंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.