याचना नहीं, अब रण होगा! नौदल सज्ज! दोन नवे व्हिडिओ जारी


मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला आहे. वेस्टर्न कमांडच्या व्हिडिओत ऑपरेशन सिंदूरची दृश्ये आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओत रामधारी सिंह यांच्या रश्मिरथी या हिंदी काव्यसंग्रहामधील याचना नहीं, अब रण होगा या कवितेच्या ओळी वापरण्यात आल्यात. या दोन्ही व्हिडिओंच्या माध्यमातून भारतीय नौदलाने इशारा दिला आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारत स्वतःचे संरक्षण आणि शत्रूला धडा शिकवण्यासाठी तयार आहे.
दोन्ही व्हिडिओ एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत. नौदलाच्या माध्यम विभागाच्या व्हिडिओला परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्‌‍ या गीतेतल्या वचनाचे शीर्षक देण्यात आले आहे. या व्हिडिओत नौदल, वायुदल आणि लष्कराच्या शत्रूवरील कारवायांची दृश्ये दाखवली आहेत. याशिवाय भारतीय नौदल धैर्याला दिशादर्शक आणि कर्तव्याला मार्गदर्शक ठेवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्व शत्रूचे सर्व वार नष्ट करण्यासाठी सक्षम असल्याचे नमूद केले आहे. या व्हिडिओला रामधारी सिंह यांच्या हिंदी काव्यसंग्रह रश्मिरथीमधील कृष्ण की चेतावनी या कवितेतील हित-वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले, मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ| याचना नहीं, अब रण होगा, जीवन-जय या कि मरण होगा| टकरायेंगे नक्षत्र-निकर, बरसेगी भू पर वही प्रखर, फण शेषनाग का डोलेगा, विकराल काल मुँह खोलेगा| दुर्योधन! रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा| भाई पर भाई टूटेंगे, वायस – श्रृगाल सुख लुटेंगे , सौभाग्य मनुज के फुटेंगे, आखिर तू भूशायी होगा,हिंसा का पर, दायी होगा| या ओळी एकायला मिळतात. तर नौदलाच्या वेस्टर्न कमांडच्या व्हिडीओत म्हटले आहे की, नियोजनबद्ध आणि प्रशिक्षित पद्धतीने ऑपरेशन सिंदूरची अंमलबजावणी करून न्याय मिळवला. या व्हिडीओत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केल्याची दृश्येही आहेत. या व्हिडिओत भारतीय जवान म्हणतो की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून ऑपरेशन सिंदुरला सुरवात झाली. हा राग नाही तर ज्वालामुखी होता. मस्तकात फक्त एकच गोष्ट होती. यावेळी शत्रूला असा धडा शिकवायचा की त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. ही बदल्याची भावना नाही तर न्याय होता. 9 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास शत्रूच्या ज्या पोस्टने युद्धबंदीचे उल्लंघन केले, त्या सर्व पोस्ट भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या आणि शत्रूला पळवले. ऑपरेशन सिंदूर एक कारवाई नाही, तर पाकिस्तानला दशकांपासून न शिकवलेला धडा होता.