राम जी देंगे सद्बुद्धी! फिर आएगा मोदी लोकसभा निवडणूक प्रचार गीत प्रसारित

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरल्यापासून भाजपा देशात भक्‍तीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदींचे व्यक्‍तिमत्त्व आणखी उजळून निघेल अशी योजना केली आहे. याच लाटेवर स्वार होत भाजपाने आज लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार गाणे प्रसारित केले आहे. ‘फिर आएगा मोदी’ हा जयघोष करीत मोदी सरकारच्या सर्व योजनांची वाहवा या दहा मिनिटांच्या गाण्यात केली आहे. ‘राम जी देंगे सद्बुद्धी, फिर आएगा मोदी’ म्हणत मतदारांना आवाहन केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येचा दौरा करत रोड शो करून वातावरण निर्मिती करणार आहेत.
लोकसभा 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. मोदींची ही तिसरी टर्म असेल. आतापर्यंत केवळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे सलग तीन कार्यकाळ देशाच्या पंतप्रधानपदी होते. नेहरूंच्या या विक्रमाची बरोबरी करण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. ‘आएगा तो मोदीही’ पासून सुरू करत ‘फिर आएगा मोदी’ पर्यंत हर प्रकारची ‘मोदी की गॅरन्टी’ भाजपाने मतदारांना दिली आहे. पक्षाने प्रसारित केलेल्या लोकसभा निवडणूक गाण्याची सुरुवात शंख फुंकण्याने होते. ‘बजेगा डंका, काम के दम का… राम जी देंगे सद्बुद्धी, फिर आएगा मोदी’ अशा ओळींनी या गाण्याची सुरुवात होते. गाण्याच्या पुढील सर्व ओळी म्हणजे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत घेतलेले निर्णय आहेत. राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे, तीन तलाकवर बंदी, उज्ज्वला योजना, जनआरोग्य योजना, वंदे भारत ट्रेन, चांद्रयान, आदित्ययान, आदि निर्णय, योजना आणि घटना या गाण्याच्या व्हिडिओत आहेत. मोदी, मोदी, मोदी असा जयघोष आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधकांच्या विरोधाला न जुमानता जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात यशस्वी ठरली, हे सांगण्यावर या व्हिडिओत भर दिला आहे. मोदी ही केवळ एक व्यक्ती नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिक आहे. रामजी आशीर्वाद देणार आणि मोदीजी पुन्हा येणार, असे या गाण्याद्वारे बिंबवण्यात आले आहे. त्याचवेळी सर्व विरोधकांना टोले मारले आहेत.
अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पुढील महिन्यात होणार आहे. पण तत्पूर्वी उद्या वातावरणात आणखी जोश भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याची सुरुवातच ते सकाळी 11 वाजता रोड शोने करणार आहेत. त्यानंतर ते नूतनीकरण केलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी 12.35 वाजता अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. दुपारी 2 वाजता ते विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येला सुमारे 15 हजार 700 कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट अयोध्येला मिळणार आहे.
मोदींच्या या दौर्‍याच्या आदल्या दिवशी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. मोदींच्या उद्याच्या दौर्‍याआधी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे अयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे.

भाजपाचे प्रचार गीत
बजेगा डंका, काम के दम का!
राम जी देंगे सद्बुद्धी, फिर आएगा मोदी।
मोदी एक व्यक्ति नहीं है, देश का है वो सन्मान,
140 करोड़ लोगों की आशाओं की है पहचान।
फिर आएगा, फिर आएगा मोदी।

मूर्तीचा निर्णय झाला, आज मुखदर्शन
अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीरामाच्या तीन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी कोणती मूर्ती मंदिरात स्थापित केली जाईल त्याचा निर्णय आज झाला. हा निर्णय घेण्यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट आणि मूर्तिकारांची बैठक झाली. तीन मूर्तींपैकी दोन कर्नाटक आणि एक राजस्थानात तयार केली आहे. पाच फुटांची बाल रामाची मूर्ती रामजन्मभूमीतील श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवड केलेल्या रामाच्या मूर्तीचे उद्या अनावरण होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top