राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचे? 9 जानेवारीपासून सुनावणी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोरील सुनावणीचे वेळापत्रक तयार झाले आहे. 9 जानेवारीपासून ही सुनावणी सुरू होऊन 27 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर अध्यक्ष निकाल देतील. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्या प्रकरणात तारखांवर तारखा सुरू आहेत. कालपासून राष्ट्रवादी अपात्रतेची सुनावणी सुरू होणार होती, पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्याने तीही पुढे ढकलण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठीही विधानसभा अध्यक्ष वेळ काढणार का, अशी चर्चा होती. पण आता राष्ट्रवादीच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे.
येत्या 9 जानेवारीपासून ही सुनावणी सुरू होणार आहे. तत्पूर्वी 6 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपवली जाणार आहेत. याचिकांसाठी अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी 8 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
2 जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह अजित पवार गटाचे 9 आमदार मंत्री झाले. शिवाय चाळीसपेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी 6 ते 27 जानेवारी या कालावधीतील 12 दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. त्यानंतर 5 डिसेंबरला आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला. शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यासाठी निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. आतापर्यंतच्या सुनावणीत अजित पवार आणि शरद पवार गटाने एकमेकांवर बनावट शपथपत्रे सादर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
सुनावणीचे सविस्तर वेळापत्रक
9 जानेवारी – फाईल्स किंवा अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. 9 तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडली जाणार नाहीत.
11 जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासणे.
12 जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.
14 जानेवारी – सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे कागदपत्र वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.
16 जानेवारी – विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय ठरणार.
18 जानेवारी – प्रतिज्ञापत्र सादर करणे.
20 जानेवारी – अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी.
23 जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी.
25 आणि 27 जानेवारी – राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top